अमोल गर्जे यांचे आमदार राजळेंसमोर आव्हान..!

अहमदनगर :

प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे वेगळे असल्याने त्यातील उमेदवार व विजयाचे दावेदारही वेगळे असतात. याचाच प्रत्यय सध्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका घेत आहे. कारण, मागील निवडणुकीत भाजपच्या शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनाच आव्हान देत भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी थेट आव्हान देत प्रचाराला सुरुवात केली आहे.

माजी आमदार राजीव राजळे यांच्या निधनानंतर तालुक्यातील राजळे गट कितपत एकसंघ आहे, याबद्दल सर्वांनाच साशंकता आहे. कारण, सध्या याच गटातील अनेकजण तोंडदेखले एकीकडे आणि खरे काम दुसरीकडे करीत असल्याचे जनता पाहत आहे. त्यातच वंजारी समाजाचा हा तालुका आहे. येथील सुमारे ८५ हजार वंजारी मतदारांनी मागील निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांना मतदान करीत माजी आमदार चन्द्रशेखर घुले यांचा पराभव केला होता. मात्र, मागील कार्यकाळात येथील वंजारी समाजाने आपल्याशी दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करीत वेगळी वाट धरली आहे. मराठा व मराठेतर समाजही येथून भाजपकडून तुटत आहे. अशावेळी स्व. गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक अमोल गर्जे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यांचे मोठे आव्हान राजळे यांच्यासमोर असेल.

येथून केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन प्रताप काका ढाकणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा प्रसंगी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. तर, घुले गट अजूनही शांत आहे. जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी आपापल्या पद्धतीने तयारीला सुरुवात केली आहे. अशावेळी राजळे यांना आव्हान नेमके कोणाचे असणार व कोण ऐनवेळी तलवार म्यान करणार याबद्दल शेवगाव-पाथर्डीत चर्चा सुरू आहे. मात्र, अमोल गर्जे यांनी एकट्यानेच आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याची घोषणा करीत तयारी केली आहे. गर्जे यांना पुणे व मुंबईतील अनेकांनी अर्थसाह्य देण्याचे मान्य करीत लढण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजा मुंडे यंदा उमेदवारीचा कौल राजळे यांना देणार की त्यात बदल करून युवा नेतृत्व गर्जे यांना संधी देणार, याकडे विधानसभा मतदारांचे लक्ष आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*