BLOG | वर्तमान जग आणि फॅसिस्ट प्रपोगंडा

दुसरे महायुद्ध सुरू होण्यापुर्वी सन 1935 पासून हिटलर व मुसोलिनीने आपले विचार किती राष्ट्रवादी आहेत हे दर्शविण्याचे अनेक प्रयत्न केले होते.जगाच्या बहुतांश भागावर ब्रिटनसह दोस्त राष्ट्रांचे साम्राज्य होते. हिटलर आणि मुसोलिनी स्वत: साम्राज्यवादी होते मात्र ब्रिटनच्या विरोधातील आपल्या लढ्यास साम्राज्यवाद न म्हणता आपण साम्राज्यवादाच्या विरोधातील लढाई लढत असल्याचे चित्र त्यांना प्रदर्शित करायचे होते. म्हणून हिटलर मुसोलीनी यांनी 
propaganda ची आखणी गोबेल्सच्या नेतृत्वाखाली सुरू केली.यासाठी खोट्या बातम्या प्रदर्शित करणे, अर्धसत्य बातम्या प्रसारीत करणे, विशिष्ट हेतू साध्य करणा-या बातम्या तयार करणे असेही त्याचे स्वरूप होते. यासाठी लक्ष्य होते, युरोपमधील संपुर्ण जनता आणि प्रामुख्याने वसाहतीमधील जनता.

भारत हा ब्रिटनच्या वसाहती पैकी सर्वात महत्वपुर्ण वसाहत होती कारण भारताच्या शोषणावरच ब्रिटनचे प्रामुख्याने पोषण झाले होते. भारताची वसाहत जर्मन अधिपत्याखाली आणणे हे हिटलरचे उद्दीष्ट होते. यासाठी त्यास भारताचे समर्थन हवे होते ,ते मिळत नसेल तर ते समर्थन आहे हे त्यास दाखवायचे होते. म्हणून propaganda strategy च्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले गेले.

मुसोलिनी आणि गांधीजीं यांची भेट झाल्याची एक बातमी इटालियन वृत्तपत्रात छायाचित्रे जोडून, म्हणजे आजच्या भाषेत फोटोशॉप तंत्र वापरून छापली गेली आणि सांगीतले गेले भारतातील जनतेच्या सर्वौच्च नेत्याचा म्हणजे भारतीय जनतेचा आम्हांला पाठींबा आहे ! फँसिस्ट propaganda आणि फेक न्यूज तथा फोटोशॉप तंत्राचा सबंध हा किती जूना आहे याचा अंदाज येऊ शकतो.

भारतीय विद्यार्थ्यांचा एक समुह युरोपियन दौ-यावर असताना तो जेंव्हा ईटली आणि जर्मनीत गेला तेंव्हा त्यांच्यासोबत अनेक इटालियन आणि जर्मन सार्जंट फिरत असत. ते भारतीय विद्यार्थांना त्यांच्या प्रवासात मुद्दाम मदत करायचे व त्यांच्या नकळत याची छायाचित्रे काढायचे आणि याच्या बातम्या युरोपियन वृत्तपत्रात आपल्या propaganda साठी प्रदर्शित करत असत. यातून ते हे दाखवत की भारतीय लोक आणि इटालियन वा जर्मन सरकार यांच्यात किती सख्य व मैत्री आहे !

कमला नेहरूंचा मृत्यू स्विट्झर्लंड मधील लॉसेल इथं झाल्यावर अंत्यविधी उरकून नेहरू कमला नेहरूंच्या अस्थी भारतात घेऊन येताना त्यांचा मुक्काम कांही तास रोमच्या विमानतळावर होता. तेंव्हा नेहरूंना भेटण्याचा त्याने खुप प्रयत्न केला. अगदी विमानतळावर येऊन भेट घेऊन फक्त कमला नेहरूंच्या निधनाबद्दल सांत्वनपुर्वक भेट घेण्याची ईच्छा व्यक्त केली. पण या भेटीचा वापर मुसोलीनी काय ,कसा आणि कशासाठी करेल याची नेहरूंना कल्पना असल्यामुळे नेहरूंनी ही भेट आवर्जून टाळली. एवढेच नव्हेतर 1938 साली नेहरूंनी हिटलरचे जर्मनीला भेट देण्याचे आग्रहाचे निमंत्रणही आवर्जून नाकारले! कारण नेहरूंना हिटलरच्या फँसिस्ट propaganda ची कार्यपद्धती पुर्णपणे माहीत होती.

फँसिस्ट एकाधिकारशाहीस समाजात स्विकृती मिळविण्यासाठी, आपल्या विचारास देशभक्ती, राष्ट्रवाद याचा मुलामा देत समाजात स्विकृती मिळवायची असते, त्याच बरोबर समाजाने आपल्याला स्विकारले आहे हे दाखविण्यासाठी समाजात स्विकृत असणा-या व लोकप्रिय नेत्यांनी आपल्याला समर्थन दिले आहे हे वारंवार प्रदर्शित करायचे असते. हे त्यांच्या propaganda strategy चे मुख्य ध्येय असते. तर कधी जनता आपल्या पाठीशी आहे, हे ही सतत दाखवायचे असते.

पृथ्वीवर अनेक देश आहेत, तीथे प्रत्येक देशाच्या परीप्रेक्षात फँसिस्ट विचार आणि त्याची 
propaganda strategy कार्यरत असतेच. स्थळ काळ याच्या अनुषंगाने propaganda strategy ची साधने बदलतात. त्याकाळी वृत्तपत्रे व रेडीओ होता, आता त्यात टिव्ही, न्यूज चँनल्स सोबत फेसबुक, ट्विटर, वॉटस् अप आदी सोशल मेडीयाचीही भर पडली आहे. म्हणून propaganda strategy व्यापक झाली आहे.

सरकारचा एखादे चुकीचा निर्णयही योग्य कसा आहे, तो सर्वमान्य असून समाजाने त्यास स्विकारले आहे हे दर्शविण्याचा प्रयत्न करणारी अनेक साधने आज सोशल मिडीयाच्या रूपात उपलब्ध आहेत. जगातील फँसिस्ट सरकारे व त्यांचे नेते याचा वापर आपल्या propaganda strategy नुसार खूप वेगाने, खूप परीणामकारक आणि खूपच यशस्वीरीत्या करत आहेत. ज्याची समाजातील अनेक लोकांना भुरळ पडत आहे. हे एका विशिष्ट देशातील चित्र नसून हे जगभर पहायला मिळत आहे.

दुस-या महायुद्धापुर्वी हिटलर नि मुसोलिनी केवळ जर्मनीत वा इटलीत लोकप्रिय होते हा भ्रम आहे. साधारणपणे 1935 ते 1939 पर्यंत हिटलर आणि मुसोलिनीचे चाहते जर्मनी आणि इटली इतकेच इंग्लंड, फ्रांन्स, अमेरिका मधेही तेवढेच होते. ज्यू लोकांच्या कत्तलीच्या वर्णनाने केवळ जर्मनी वा इटली नव्हेतर इंग्लंड, फ्रांन्स ,स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड, पोलंड आदी देशांतील लोकही आनंदी होत असतं. कारण संपुर्ण युरोप मधे अँटीसेमेटीझम होता. अगदी शेक्शपियरच्या नाटकांतूनही हा प्रदर्शित होतो. Merchant of Venice या नाटकातील Shylock हे पात्र खलनायक होते आणि ते ज्यू होते!

शीतयुद्धात आणि त्यानंतर , फँसिस्ट propaganda strategy चा वापर जगातील दोन्ही महाशक्तींनी व त्यांच्या समर्थक देशांतील अनेक पक्षांनी केला आहे. पण दोन्ही महाशक्तीपासून आणि त्यांच्या 
propaganda strategy पासून अलिप्त असणा-या देशांनी याचा विरोध करण्याचे धोरण 1950 पासून अवलंबिले होते, तेही आता संपले आहे. कारण जागतिक राजकारणाच्या अनुषंगाने अलिप्त असणारे देशही अंतर्गत पातळीवर हीच फँसिस्ट propaganda strategy स्विकारत आहेत. ही बाब जागतिक पातळीवरील मानवतेच्या अनुषंगाने अतिशय चिंताजनक आहे.

© राज कुलकर्णी, उस्मानाबाद

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*