विलासराव देशमुख | सरपंच झाला मुख्यमंत्री..!

लातूरमधल्या बाभळगावचे ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे मुख्यमंत्री असा झंझावाती प्रवास करणारे आणि नंतर केंद्रातही मंत्रीपद भूषवणारे मुरब्बी नेते आणि राजकारणातील एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व विलासराव देशमुख यांचा आज दि. 14 ऑगस्ट स्मृतिदिवस.

इ.स. १९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते १६ जानेवारी, इ.स. २००३ व १ नोव्हेंबर, इ.स. २००४ ते ४ डिसेंबर, इ.स. २००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हिंदी चित्रपटांतील अभिनेता रितेश देशमुख हा त्यांचा पुत्र आहे.

विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे इ.स. १९७४ मध्ये ते बाभळगावचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीस सुरूवात केली. युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असे करीत करीत ते इ.स. १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. १९७४ ते १९८० दरम्यान त्यांनी लातूर पंचायत समितीच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. उस्मानाबाद जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी पंचसूत्री कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील तरूणांना कॉंग्रेसच्या झेंड्याखाली संघटीत करून ते कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले.

इ.स. १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिले नाही. पुढे इ.स. १९९५ पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.

यानंतर त्यांनी राज्याच्या राजकारणात पाय रोवण्यास सुरूवात केली. १९८० ते १९९५ पर्यंत ते सलग तीनदा आमदार म्हणून राज्य विधानसभेवर निवडून गेले. या कालावधीत त्यांनी गृह, सार्वजनिक प्रशासन, सहकार, उद्योग, ग्रामीण विकास, शिक्षण, तंत्रशिक्षण आणि क्रिडा व युवक-कल्याण मंत्रालयांचा कार्यभार सांभाळला.

१९९५ मध्ये ते त्यांच्याच मतदारसंघात पराभूत झाल्याने त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रश्चचिन्ह निर्माण झाले. त्यांच्यासमोरील राजकीय अस्तित्वाचे हे मोठे आव्हान होते. मात्र १९९९ ते परत विधानसभेवर निवडून आले आणि त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. १८ ऑक्टोबरला ते मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाले. दरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींमुळे १७ जानेवारी २००३ मध्ये त्यांना

मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आणि सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री बनले.
ऑक्टोबर २००४ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूकीनंतर नोव्हेंबर महिन्यात देशमुख दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनले. मात्र २००८ मधील मुंबई हल्ल्यानंतर वादात सापडलेल्या विलासरावांना नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. पक्षश्रेष्ठींना त्यांना राज्याच्या राजकारणातून केंद्रात कार्यरत करण्याचा निर्णय घेतला. ते राज्यसभेवर निवडून आले आणि २००९ मध्ये त्यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले. यानंतर ग्रामीण विकास मंत्रालयाचा कार्यभार त्यांना सोपवण्यात आला.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभार सांभाळत होते. विलासराव देशमुख हे निव्वळ राजकारणी नव्हते. वडिल दगडोजी यांच्याकडून शास्त्रीय संगीताच्या उत्तम जाणकारीचा वारसा त्यांना लाभला होता. मराठी पुस्तकं असोत की नाटकं त्यांचे ते उत्तम भोक्ते रसिक होते. त्यांचं लावणीचं प्रेमही असंच रसिक होतं. त्यामुळे सर्वच कलाकाऱांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बहुरंगी आणि बहुश्रुत व्यक्तिमत्वामुळे त्यांचं वक्तृत्व हेही प्रसन्न आणि उमदं होतं. त्यामुळेच ते मुख्यमंत्री असताना काही नाराज आमदार त्यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करीत असल्याबद्दल त्यांना कधी विचारलं तर ते सहजपणे सांगत की, पूर्वी मी नुसता मंत्री असताना हेच करायचो. त्यामुळे आता नवीन लोक ते करीत असतील तर त्यात काही विशेष नाही.

विलासराव देशमुख यांचं १४ ऑगस्ट इ.स. २०१२ रोजी दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने चेन्नईत ग्लोबल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असताना ह्रदय विकाराचा झटका येऊन निधन झालं..विलासरावांवर या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याअगोदर विलासराव देशमुख यांच्यावर पंधरा दिवसांपासून उपचार करण्यात येत होते. मुंबईतल्या ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण प्रकृती गंभीर बनल्यानंतर त्यांना तातडीनं चेन्नईला हलवण्यात आलं.. विलासराव देशमुख यांना यकृताचा कॅन्सर झाला होता. तसच त्यांच्या दोन्ही किडन्याही खराब झाल्या होत्या. विलासराव देशमुख यांना व्हँटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणं कठिण झालं होतं. त्यांच्यावर यकृतरोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण शेवटी १४ तारखेला त्यांची प्राणज्योत मालवली…

सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच आग्रही होते. मराठवाडय़ातील सिंचन प्रकल्पाला गती देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. मुंबईसारख्या महागडय़ा शहरात सामान्य माणसाला हक्काचे घर मिळावे म्हणून गृहनिर्माण धोरण राबविण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत घेतला होता. मंत्रिमंडळातील सहकार्यांवर विश्वास दाखवून त्यांच्याकडून सर्वोत्तम काम करवून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. प्रत्येक विषयाची जाण असणारा, त्या विषयाचे विविध कंगोरे माहिती असणारा, समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणारा मुख्यमंत्री म्हणून ते नेहमीच आठवणीत राहतील.

लेखक : योगेश शुक्ला, मृदंग, जळगाव.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*