BLOG | बलुचिस्तानचा नेमका वाद काय?

भारत सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याचे दोन तुकडे करतानाच त्या दोन्ही भागांना केंद्रशासित केले आहे. त्यावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. काश्मिरी जनता यात अजूनही व्यक्त (व्यक्त होण्याची संधी न मिळाल्याने) झालेली नाही. त्याचवेळी भारतात यावरून दोन मतप्रवाह आहेत. अशावेळी पाकिस्तानच्या आधिपत्याखालील काश्मीरचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यावर युद्धजन्य ढग दिसायला लागलेले असतानाच पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान भागात स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेही या भागाबद्दल एकदा जगजाहीर आस्था जाहीर केलेली आहे. त्यामुळेच बलुचिस्तान भागातील थोडक्यात घटनाक्रम देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.

बलुचिस्तानी नागरिक ११ ऑगस्ट रोजी बलुचिस्तान दिवस साजरा करते. यंदा जगभरातील बलुचिस्तानी नागरिकांनी आपापल्या भागात हा दिवस विविध कार्यक्रम घेत साजरा केला. तसेच पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळविण्याची मागणीही त्या कार्यक्रमात केली. युरोपमध्ये असे कार्यक्रम घेताना स्वातंत्र्य मिळविण्याची शपथ घेतानाच हा लढा अखेरपर्यंत पुढे नेण्याची घोषणा करण्यात आली.

बलुचिस्तानी स्वातंत्र्य योद्ध्यांचे म्हणणे आहे की, ब्रिटिशांनी ११ ऑगस्ट १९४७ रोजी बलुचिस्तानला स्वातंत्र्य दिले होते. मात्र, २७ मार्च १९४८ रोजी पाकिस्तानने लष्करी बळाचा वापर करून हा भाग ताब्यात घेऊन कलात प्रांताला जोडला. तेंव्हापासून येथे स्वातंत्र्य लढा सुरू आहे.

पाकिस्तान आणि इराण अशा दोन्ही देशांमध्ये सध्याचा बलुचिस्तान विभागाला आहे. त्याची क्वेट्टा ही राजधानी पाकिस्तानच्या भागात आहे. तर, इतर प्रदेश इराण देशात आहे. हे दोन्ही भाग एकत्र करून नवीन बलुचिस्तान देश स्थापन करण्याचा हा लढा आहे.

पाकिस्तानने १९४८ नंतर १९५८-५९, १९६२-६३ आणि १९७३-७७ मध्ये येथील बंड लष्करी ताकदीच्या बळावर मोडून काढले. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार भारतीय तपास यंत्रणा (रॉ) या भागात बंडखोरांना मदत करीत आहे. या वैराण भागात अनेक स्वतंत्र्यतावादी टोळ्या आजही काम करीत आहेत. त्यांच्याकडे आधुनिक हत्यारे व लष्करी यंत्रसामुग्रीही आहे.

या भागातील जनतेला विकासाच्या प्रक्रियेतून पाकिस्तानने बाहेर फेकले आहे. त्यांना सरकारी नोकरीमध्ये सापत्न वागणूक सर्रास दिली जाते. तसेच पाकिस्तानी लष्कर या भागातील महिलांना लक्ष्य करीत असल्याचेही आरोप होतात. या भागात बीबीसी आणि इतर जागतिक माध्यम संस्थांच्या प्रतिनिधींना लष्कर व पाकिस्तानी लक्ष्य करीत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. तरीही या माध्यमांनी या भागातील बातमीदारी बंद न करता आपले पत्रकारितेचे व्रत कायम ठेऊन काम सुरू ठेवेले आहे.

येथील महिलांवर बलात्कार करण्यासह पुरुषांना ठरवून मारले जात असल्याचे आरोप आहेत. अशा पद्धतीने हा भाग आजही पाकिस्तानी आक्रमक लष्करी कारवायांना भिक न घालता लढत आहे. पाकिस्तान व बलुचिस्तान हे दोन्ही भाग व इराणही इस्लामिक देश आहेत. तरीही त्यांच्यामध्ये असा स्वातंत्र्य मिळविण्याचा लढा सुरू आहे. धर्म एका देशाला बंधू शकत नसल्याचे हे उदाहरण आहेच की…

लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*