Blog | केक आणि क्रीम

कालचीच गोष्ट. रात्री साडेआठ नऊला घरी निघालेलो. एकजणाची वाट पाहत हडपसरच्या उड्डाणपुलाशेजारी थांबलो. कॉलेजची काही मुलं-मुली तिथं शेजारीच थांबलेली. लाल स्विप्टच्या बोनेटवर त्यांनी केक ठेवलेला आणि बर्थडे सेलिब्रेशन सुरु झालेलं. सगळे मनसोक्त हसत होते. बर्थडेबॉयने केक कापला आणि शेजारी उभ्या असलेल्या गोर्‍यागोमट्या पोरीला केक भरवला. इतक्यात त्याच्या मित्रांनी केकमध्ये हात घातला आणि मुठीत केकचा लगदा उचलून बर्थडेबॉयच्या तोंडाला चोळला. तसे सारेजण केकवर तुटून पडले. प्रत्येकाने मिळेल तसा केक ओरबडला आणि एकमेकांच्या तोंडाला फासला.

शांतपणे मी हे पाहत होतो, तशीच भिकार्‍याची दोन लेकरही हे पाहत होते. आमच्या तिघांच्याही नजरेत सारखीच हतबलता.

बर्थडे बॉयने बोटानं चेहर्‍यावरचा केक पुसला आणि शेजारच्या दगडांवर हात झटकला. चिखल चिकटावा तसा तो केक दगडावर, उड्डापुलाच्या भिंतीवर चिकटला. केक वरची क्रीम संपली तशी पोरांची मस्तीही संपली. निम्मा केक कचऱ्यात फेकून पोरं स्विफ्टमध्ये बसुन निघुन गेली.

केकचा अर्धा बॉक्स सापडताच भिकाऱ्याची पोरं हरखून गेली. धावत धावत त्यांनी आईकडं बॉक्स नेला. पुलाखालीच त्यांची आई तान्ह्या बाळाला मांडीवर घेऊन फुलं विकायला बसलेली. पोरांनी तिच्यासमोर केक धरला आणि त्यावरचा कचरा, माती झटकत मटामट केक खाऊ लागले. मांडीवरच्या तान्ह्या लेकराला ती माउली बोटानं केक चाटवू लागली. तोच त्यातल्या एका पोरांन मांडीवरच्या लेकराच्या तोंडाला केक फासला. कॉलेजच्या पोरांनी जसं केलं होतं, तसच या पोरानंही करुन पाहिलं. हे बघताच सनकन पोराच्या मुस्काडीत बसली. डोळ्यातून ठिणग्या झाडत आई म्हणाली, ‘
‘आयघाल्या खाऊहेना तो. अशी नासाडी करत्यात का ? माज आलाय का लय भाडकाव ?”

लेकरु गाल चोळत गपगुमान घाबरत घाबरत केक चाटू लागलं. इकडं मातीत, दगडावर पडलेला केकही कुत्री चाटत होती. त्या कुत्र्यांच्या डोळ्यातही तसलीच कसलीतरी भीती होती.

बाकी जग मात्र धावत होतं. रोजच्या सारखंच…

लेखक : नितीन थोरात, साहित्यिक व सामाजिक अभ्यासक, पुणे

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*