Blog | वात्सल्य ‘सिंधू’ व्यक्तिमत्वाला भावपूर्ण निरोप!

जिल्ह्यासह राज्यातील मान्यवरांकडून सिंधूताई विखेना श्रध्दांजली!

प्रवरा परिसराच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक वाटचालीत आपले योगदान देणा-या श्रीमती सिंधुताई एकनाथराव विखे पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. जिल्‍ह्यासह राज्‍यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्‍यवरांनी स्‍व.सिंधुताई विखे पाटील यांच्‍या आठवणींना उजाळा देत भावपुर्ण आदरांजली अर्पण केली. जेष्‍ठ सुपुत्र डॉ.अशोक विखे पाटील, मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील आणि डॉ.राजेंद्र यांनी गितेचा १५ वा अध्‍याय आणि मंत्रोच्‍चारात पार्थिवाला अग्नि दिला.

रविवारी पहाटे वृद्धापकाळाने सिंधुताई विखे पाटील यांचे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. माजी केंद्रीय मंत्री स्‍व.पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या पत्‍नी आणि डॉ.अशोक, मंत्री राधाकृष्ण व डॉ.राजेंद्र विखे पाटील यांच्या मातोश्री होत्या. गेली अनेक दिवस त्‍या वृध्‍दापकाळाने आजारी होत्‍या. दोन दिवसापुर्वीच तब्‍येत खालविल्‍याने त्‍यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले होते. उपचार सुरु असतानाच रविवारी पहाटे, ५.४५ वा. त्‍यांची प्राणज्‍योत मालवली. श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांच्‍या निधनाचे वृत्‍त समजताच लोणी आणि पंचक्रोशितील गावांमध्‍ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले. ग्रामस्‍थांनी आपले सर्व व्‍यवहार बंद ठेवून दु:ख व्‍यक्‍त केले. जिल्‍ह्यासह राज्‍यातून सिंधुताई विखे पाटील यांचे अंत्‍यदर्शन घेण्‍यासाठी विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी लोणीत दाखल झाले. राज्‍याचे मुख्‍यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्‍यक्ष ना.चंद्रकांत दादा पाटील, माजी मुख्‍यमंत्री अशोकराव चव्‍हाण, ना.पंकजाताई मुंढे आदिंनी आपला शोकसंदेश पाठवुन सिंधुताई विखे पाटील यांना आदरांजली वाहुन विखे पाटील परिवाराचे सांत्‍वन केले.

सिंधुताई विखे पाटील यांचे पार्थीव अत्‍यंदर्शनासाठी काही काळ त्‍यांच्‍या निवासस्‍थानी आणि त्‍यानंतर प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात ठेवण्‍यात आले होते. ह.भ.प उध्‍दव महाराज मंडलिक, माजी न्‍यायमुर्ती बी.जी कोळसे पाटील, विधानसभेचे उपाध्‍यक्ष आ.विजयराव औटी, जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना.राम शिंदे, महाराष्‍ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्‍यक्ष आ.बाळासाहेब थोरात, खा.सदाशिवराव लोखंडे, शिवाजीराव कर्डीले, आ.बाळासाहेब मुरकुटे, आ.स्‍नेहलता कोल्‍हे, आ.मोनीका राजळे, आ.भाऊसाहेब कांबळे, आ.वैभव पिचड, आ.राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भानुदास मुरकुटे, अनिल राठोड, माजी खासदार दादा पाटील शेळके, भाऊसाहेब वाकचौरे, दिलीप गांधी, रोहीत पवार, दादाभाऊ कळमकर, चंद्रशेखर घुले, अशोकराव काळे, रावसाहेब म्‍हस्‍के, जिल्‍हा बॅंकेचे चेअरमन सिताराम गायकर, सभापती अनुराधा नागवडे, कोपरगावचे नगराध्‍यक्ष विजय वहाडणे, श्रीरामपुरच्‍या नगराध्‍यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्‍यक्ष करण ससाणे, जेष्‍ठ साहित्‍यीक लहु कानडे, संगमनेरच्‍या नगराध्‍यक्षा दुर्गाताई तांबे, यांच्‍यासह राज्‍यातून आणि जिल्‍ह्यातून आलेल्‍या आजीमाजी लोकप्रतिनिधींनी तसेच प्रशासकीय क्षेत्रातील आधिका-यांनी सिंधुताई विखे पाटील यांचे अंत्‍यदर्शन घेवून श्रध्‍दांजली अर्पण केली.

याप्रसंगी झालेल्‍या शोकसभेत बोलताना जिल्‍ह्याचे पालकमंत्री राम शिंदे म्‍हणाले की, या परिसराच्‍याच नव्‍हे तर संपुर्ण जिल्‍ह्याच्‍या विजय प्रक्रीयेत आदरणीय सिधुताई विखे पाटील यांनी सर्वसामान्‍य माणसाला घडविण्‍यात आणि त्‍यांच्‍या जिवनात क्रांती घडविण्‍यात मोलाचे योगदान दिले असल्‍याचे नमुद करुन महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने श्रध्‍दांजली अर्पण केली.

माजी न्‍यायमुर्ती बी.जी कोळसे पाटील म्‍हणाले की, राजकीय, सामाजिक जिवनात काम करताना त्‍याग काय असतो हे स्‍व.बाळासाहेब विखे पाटील आणि सिंधुताई विखे पाटील यांनी आम्‍हाला शिकविले. जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष असतानाही बाळासाहेब आणि सिंधुताई बसने प्रवास करत या आठवणींला उजाळा देत त्‍यांचा आदर्श घेवून वाटचाल करण्‍याचे आवाहन या नि‍मित्‍ताने केले.

ह.भ.प उध्‍दव महाराज म्‍हणाले की, सिंधुताई विखे पाटील यांनी आध्‍यात्‍मातुन महिलांचे संघटन उभे केले. चांगला विचार आणि सकारात्‍मक वृत्‍तीतुन हा समाज आणि परिसर घडविण्‍यासाठी त्‍यांनी केलेले कार्य आज हा परिसर पुढे घेवून जात आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात या परिसराने केलेली प्रगती हे सिंधुताईंच्‍या कर्तृत्‍वाचे लक्षण असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

ग्रामीण भागात प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांच्या उत्कर्षासाठी उल्लेखनीय रचनात्मक कार्य करून त्यांनी महिलांना प्रगतीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने, मातोश्री रमाबाई आंबेडकर आदर्श महिला पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

सिंधुताई विखे पाटील यांनी महिला मंडळाच्या माध्यमातून प्रियदर्शनी सार्वजनिक वाचनालय आणि महिलांसाठी पहिली सहकारी पतसंस्था सुरु केली. याच संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पुणतांबा येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरु केले. कोपरगाव येथे नामदेवराव परजणे पाटील कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालय, लोणी येथे प्रियदर्शनी ग्रामीण अध्यापक महाविद्यालय त्यांनी सुरु करून ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला दिशा देण्याचे मोठे काम केले.

महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी १९९७ साली महिलांकरिता महिला शिवणकला प्रशिक्षण केंद्र, महिला लघुउद्योग केंद्र, अद्वैत महिला भजनी मंडळाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे संघटन उभे केले. महिला बचत गट मेळावे, माता बालसंगोपन शिबीर अशा सामाजिक उपक्रमातून श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांनी महिलांना सामाजिक कार्यात सक्रियतेने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.

लेखक : प्रशांत कांबळे (राहाता, जि. अहमदनगर)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*