दिनविशेष | राजीव गांधी

आज 20 ऑगस्ट. भारताच्या संगणकीय युगाचा पंतप्रधान म्हणून ओळखले गेलेले राजीव गांधी यांची जयंती.

राजीव गांधीचा जन्म भारताच्या प्रसिद्ध राजकीय घराण्यात झाला. आजोबा जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरू यांची मुलगी इंदिरा गांधी यांनी काँग्रेसचे एक सदस्य फिरोज गांधी यांच्या सोबत विवाह केला. इंदिरा गांधींनी इ.स. १९४४ मध्ये राजीव यांना जन्म दिला. याकाळात त्यांचे आईवडील स्वातंत्र्य लढयातील सहभागामुळे सतत तुरुंगात असत. अखेर इ.स. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते अलाहाबाद येथे स्थायिक झाले. पण इ.स. १९४९च्या सुमारास इंदिरा व फिरोज यांच्यात दुरावा निर्माण झाला. व इंदिरा मुलांसकट पित्याकडे दिल्लीला परतल्या व पुढेही पित्यासोबतच रहिल्या. इ.स. १९६० मध्ये फिरोज गांधींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

राजीव गांधीचे सुरुवातीचे शिक्षण बोर्डिंग स्कूल मध्ये झाले. इ.स. १९६१ ला पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. केंब्रिजमध्ये असताना इ.स. १९६५ च्या जानेवारीत त्यांची ओळख इटलीच्या ॲन्टोनीया माईनो (Antonia Maino – सोनिया गांधी) यांच्याशी झाली. पुढे इ.स. १९६८ मध्ये त्यांनी भारतात येऊन त्या दोघांनी विवाह केला. इ.स. १९६७ मध्ये आई इंदिरा या भारताच्या पंतप्रधान बनल्या तरी राजीव राजकारणापासू दूर रहात इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक म्हणुन रुजू झाले.त्यांना इ.स. १९७० मध्ये राहुल तर इ.स. १९७२ मध्ये प्रियांका ही दोन अपत्ये झाली.

राजीव गांधी जगभर फिरत होते. ते जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा ते परदेशात होते. तेथील प्रगत जगाचा आणि वैज्ञानिक युगाचा अनुभव ते घेत होते. शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर ते जगातील प्रगतीची आणि आपल्या देशाची तुलनाही करत असतील, दुर्दैवाने संजीव गांधी यांचे अपघाती निधन झाले आणि तो अपघातही विमान उडवत असतानाच. त्यानंतर त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांचा सहकारी म्हणून राजीव गांधी यांची अत्यंत गरज होती. सोनिया गांधी यांची इच्छा नसताना राजीव गांधी यांना राजकारणाच्या या निसरडय़ा खेळात उतरावे लागले. तो दिवस आठवला की, अंगावर शहारा येतो. ३० ऑक्टोबरचा तो दिवस. ओरिसाच्या दौ-यावर असलेल्या श्रीमती इंदिरा गांधी जाहीर भाषणात सांगत होत्या, ‘मैं आज जीवित हूँ.. शायद कल नही रहूंगी, लेकीन मेरे खुन का कतरा कतरा देश को एक रखनेमें मदत करेगा।’ ओरिसाचा दौरा करून इंदिराजी परत येतात काय, तोच ३१ ऑक्टोबरच्या सकाळी ९.३० वाजता त्यांचेच सुरक्षारक्षक त्यांच्यावर गोळय़ा झाडतात काय?.. सगळा देश हादरून गेलेला..

महात्माजींचा खून ज्या विकृतीने झाला.. तीच विकृती अजून जाती-धर्माच्या बाहेर न जाता या देशात इंदिराजींचे रक्त सांडून गेले. राजीवजी त्या क्षणाला दिल्लीत नाहीत.. ते कलकत्त्यात आहेत.. आपल्या मातेचे इतके भीषण निधन झाल्याची बातमी कलकत्त्यात समजल्यावर शांतचित्तेने ते दिल्लीत येतात. देशातील सर्व काँग्रेसश्रेष्ठी एकत्र येऊन पंतप्रधानपदासाठी राजीव गांधी यांचेच नाव निश्चित करतात. आईचे पार्थिव घरात असतानाच पंतप्रधानपदाची शपथ घेणारा हा सर्वात तरुण पंतप्रधान. आईचे कलेवर तसेच ठेवून दिल्लीत सुरू झालेल्या भीषण दंगलीला आटोक्यात आणण्याकरिता रात्रभर रस्त्यावर फिरतो.. शांततेचे आवाहन करतो..काय त्यांच्या भावना असतील..गांधी चित्रपट निर्माण करणा-या परदेशी दिग्दर्शकाला राजीवजींच्या या भावनेवर तितकाच हृदयस्पर्शी चित्रपट उभा करता येईल, इतके हे जीवनातील जिवंत नाटय़ आहे. काय त्यांच्या मनाची खळबळ झाली असेल, अश्रूला वाट देता येत नाही. आपले दु:ख सामाजिक दु:खात बुडवून टाकून हा तरुण रात्रभर पंतप्रधान म्हणून रस्त्यावर फिरत आहे. नंतरचा सगळा विकास देशासमोर आहे..
संजय गांधी ज्या मतदारसंघाचे खासदार होते त्या अमेठी मतदारसंघातून राजीव गांधी यांनी लोकसभेची पोटनिवडणूक लढवली आणि लोक दलाचे उमेदवार शरद यादव यांचा दोन लाख मतांनी पराभव करून ते लोकसभेत प्रवेशकर्ते झाले. इंदिराजींचे प्रमुख सल्लागार आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशा कामांनी त्यांनी सुरुवात केली. मलईमालानगर (तामिळनाडू) येथील १९८२च्या काँग्रेस अधिवेशनात राजीव गांधी यांनी राजकीय अनुभव फारसा नसताना अतिशय टापटिपीने, नेटकेपणाने अधिवेशन यशस्वी करून दाखवले. त्यांच्याबरोबर त्यावेळी अजित पांजा, अरुण नेहरू, सॅम पित्रोदा अशी तरुण मंडळी सहकारी आणि सल्लागार म्हणून काम करत होती.

इंदिरा गांधींची भीषण हत्या झाल्यानंतर राजीव गांधींनी पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली आणि १९८५साली होणारी लोकसभेची सर्वसाधारण निवडणूक त्यांनी मुदतपूर्व निवडणूक करून डिसेंबरमध्येच घेतली. पंडित नेहरूंच्या काळातही काँग्रेसला एवढे मोठे यश मिळाले नाही, असे प्रचंड यश राजीव गांधींनी काँग्रेसला मिळवून दिले. ५४२ पैकी काँग्रेसने ४११ जागांवर विजय मिळवला. भारताच्या लोकसभेत एका पक्षाच्या विजयाचा हा विक्रमी आकडा आहे. आज जवळपास ३० वर्षानंतर काँग्रेस ४११ वरून ४५ वर आलेली आहे.
राजीव गांधी यांनी आपल्या कार्यकाळात या देशाला नेमके काय दिले. या देशाची दृष्टी विज्ञानवादी केली आणि जग लांब लांब कुठेतरी असे त्यावेळेपर्यंत भासत असताना ‘दुनिया मुठ्ठी में’ ही संकल्पना राजीव गांधी यांच्या निर्णयातून झाली. ‘राजीव गांधी देश कसा सांभाळू शकतील,’ अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली होती; पण जगाच्या प्रगत देशांना समोर ठेवून या देशात संगणकीय क्रांती केली पाहिजे आणि ‘टेलिकम्युनिकेशन’ क्षेत्राला खूप मोठा बढावा दिला पाहिजे म्हणून या दोन विषयांना त्यांनी हात घातला आणि संगणकीय क्रांतीची सुरुवात भारतात त्यांनी करून दिली. आधुनिक जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर ‘कम्युनिकेशन’ आणि ‘संगणक’ ही दोन शस्त्रे अशी आहेत की, ज्यांच्या साहाय्याने जगात तुम्ही तुमचा प्रभाव पाडू शकता, हे राजीव गांधींना पहिल्यांदा कळले.
संगणकीय तज्ज्ञ सॅम पित्रोदा यांच्यासारख्या तज्ज्ञांच्या मदतीने या देशात संगणकीय क्रांतीचा पाया राजीव गांधी यांनी घातला. १९८५-८६ नंतरचा काळ आठवा. गावागावातील नाक्यावर एस.टी.डी.चे बुथ होते. या एस.टी.डी. यंत्रणेमार्फत जगात कुठेही फोनवरून संपर्क करता येत होता. रात्रीचे दर कमी होते. त्यामुळे खेडय़ापाडय़ांतील बुथवर रात्री एस.टी.डी. फोन करण्याकरिता, आय.एस.डी. फोन करण्याकरिता रेशन दुकानासारख्या रांगा लागलेल्या असायच्या. राजीव गांधी यांच्या प्रयत्नातूनच आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच १९८६ साली एम.टी.एन.एल.चा जन्म झाला आणि पी. सी. ओ. सिस्टीममार्फत जगभरात एक टेलिफोन नेटवर्क त्यावेळेपासून सुरू झाले. याचे सगळे श्रेय राजीव गांधी यांना जाते. ज्या सॅम पित्रोदा यांनी सर्व संगणकीय क्रांतीसाठी आपली बुद्धिमत्ता पणाला लावली आणि विनावेतन ही सेवा देशाला दिली.

देशाचा हा सर्वात तरुण पंतप्रधान जेव्हा युनोमध्ये प्रवेश करता झाला त्यावेळी जगातील सर्व पंतप्रधानांनी उभे राहून टाळय़ांचा गजर करून त्यांचे स्वागत केले होते. राजीव गांधी यांची दृष्टी पूर्णपणे वैज्ञानिक होती. आधुनिक भारत त्यांना वेगळय़ा पद्धतीने घडवायचा होता. त्यासाठी देशातील युवाशक्ती ही सर्वश्रेष्ठ ताकद आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यामुळेच केवळ आणि केवळ राजीव गांधी यांच्या आग्रहाने या देशात तरुणाचे वय २१ र्वष पूर्ण झाल्यानंतर जो मतदानाचा अधिकार होता तो राजीव गांधी यांनी हे वय १८ वर्षापर्यंत केले आणि देशातील तरुणांना त्यांनी फार मोठी राजकीय शक्ती दिली. राजीवजींच्या या निर्णयावर टीकाही झाली होती. कारण जेव्हा मतांचा अधिकार २१ वर्षाचा होता त्यावेळी १८ वर्षाची मुले बोगस मतदानासाठी उभे राहात होती. तशी काही मुले पकडलीही गेली. आता तर १८ वर्षाचा अधिकार मिळाल्यावर १५ वर्षाच्या मुलांना चेव आला. पण ही सगळी तात्कालिक गोष्ट होती. १८ वर्षे हे ‘सज्ञाना’चे वय मानले गेल्यानंतर त्या तरुणाला तीन वर्षे मतदानापासून वंचित ठेवणे योग्य नाही, अशी राजीव गांधी यांनी भूमिका मांडली. त्यांचा आणखी एक निर्णय कमालीचा गाजला. त्यांच्या असे लक्षात आले की, गावपातळीपर्यंत केंद्र सरकारची मदत पोहोचण्यात मधील दलाल फार मोठी भ्रष्टाचाराची साखळी उभी करतात. केंद्राकडून येणारा पैसा राज्याकडे, राज्याकडून जिल्ह्याकडे, जिल्ह्याकडून तालुक्याकडे, तालुक्याकडून ग्रामपंचायतीकडे या मधल्या टप्प्यात बरेच मोठे बोके आहेत, म्हणून राजीव गांधी यांनी अशी योजना केली की, ग्रामीण पातळीवर जो पैसा द्यायचा तो थेट ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांच्या या निर्णयाचे फार मोठे स्वागत झाले.

फक्त शाह बानू पोटगी निर्णयानंतर घटनादुरुस्ती करण्याचा राजीव गांधी यांचा निर्णय हा चुकलेला निर्णय होता, दबावाखाली घेतला होता. त्याचा काँग्रेसला फटकाही बसला. काही निर्णय चुकले तरी, राजीवजींचे व्यक्तिमत्त्व उमदे होते आणि त्यांना भारताची वैज्ञानिक बांधणी करायची होती ही गोष्ट मान्य करावी लागेल.

त्यांच्या काळात काँग्रेस पक्षाला निवडणुकीत मोठा विजय मिळाला असला तरी पक्षात गटातटाचे राजकारण बांडगुळासारखे वाढलेले आहे, हे त्यांच्या लक्षात आले. २८ डिसेंबर १९८५ रोजी मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या शताब्दी अधिवेशनात राजीव गांधींनी या बांडगुळांवर जोरदार हल्ला चढवला. ते त्यांचे भाषण ऐतिहासिक ठरले होते. पंडितजी आणि इंदिराजींप्रमाणेच जागतिक शांततेसाठी प्रयत्नशील असलेले राजीवजी यांनी श्रीलंकेत शांती सेना पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच निर्णयामुळे ‘लिट्टे’ या दहशतवादी संघटनेने कट करून त्यांचे जीवन संपवले. जगातल्या ३२ देशांनी या लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. जगामध्ये असे उदाहरण सापडणे दुर्मीळ आहे. पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांची ज्या प्रवृत्तीने हत्या केली, त्यानंतर त्यांचा सुपुत्र असलेल्या आणि पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांचीही हत्या त्याच विकृतीतून झाली. आई आणि मुलगा पंतप्रधान आणि दोघांचीही अतिरेक्यांकडून हत्या हे सुद्धा जगातील फार मोठे भीषण नाटय़ आहे. राजीवजींच्या नेतृत्वाची उणीव काँग्रेसलाच नव्हे तर देशालाही भासत राहते. राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजीव गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५ पासून त्याची छपाई बंद करण्यात आली. धर्मपाल कांबळे यांनी राजीव गांधी यांचे मराठी चरित्र लिहिले आहे.

लेखक : योगेश शुक्ला, जळगाव

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*