सिंधुदूर्ग येथे कालव व जिताडा मस्त्यबीज उत्पादन केंद्र

मुंबई :

राज्यात सागरी उत्पादनवृद्धीस प्रोत्साहन देण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग आणि कांदळवन व ‘सागरी जैवविविधता संवर्धन फौंडेशन’ने सिंधुदूर्ग येथे कालव बीज उत्पादन केंद्र उभारण्याबाबत केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेबरोबर (सीएमएफआरआय) तर जिताडा बीज उत्पादन केंद्र उभारण्याबाबत ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिशवॉटर ॲक्वाकल्चर’ (सीबा) यांच्याबरोबर त्रिपक्षीय सेवा करार केला.

कालव आणि जिताडा ही दोन्ही मत्स्यबीज केंद्र वेंगुला (जि. सिंधुदुर्ग) तालुक्यातील उभा दांडा येथे उभारण्यात येणार आहेत. जिताडा मत्स्यबीज उत्पादन केंद्रामध्ये प्रतिवर्षी 20 लाख मत्स्यबीजाचे उत्पादन घेतले जाणार आहे. या केंद्राची उभारणी आणि संचालनासाठी ‘सीबा’तांत्रिक सहाय्य आणि सल्ला पुरविणार आहे. कालव बीज उत्पादन केंद्रामध्ये प्रतिवर्षी 1 कोटी बीजाची निर्मिती केली जाणार आहे.

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली या दोन करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव, कांदळवन विभागाचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक तथा कांदळवन व सागरी जैवविविधता संवर्धन फौंडेशनचे कार्यकारी संचालक एन. वासुदेवन, ‘सीबा’चे संचालक डॉ. के. के. विजयन, सीएमएफआरआयचे प्रधान संशोधक डॉ. पी. के. अशोकन, मत्स्यव्यवसाय सहआयुक्त राजेंद्र जाधव, मत्स्यव्यवसाय विभागाचे उपसचिव श्रीनिवास शास्त्री, कुला ॲक्वा कन्सल्टन्ट प्रा. लि. चे आर. कुलशेखरन आदी उपस्थित होते.

सीएमएफआरआय  आणि सीबा या दोन संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेशी (आयसीएआर) संलग्न असून मत्स्यसंवर्धन, संशोधन व विकासामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत तसेच कांदळवन व सागरी जैवविविधता संवर्धन फौंडेशनचे सहकार्य आणि आर्थिक सहाय्यातून हे मत्स्य बीज निर्मिती केंद्र उभारण्यात येणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*