पाचपुतेंचा पक्ष कोणता; विरोधात कोण, याचीच श्रीगोंद्यात चर्चा

अहमदनगर :

नगर जिल्ह्यातील कंपूशाही व नात्यागोत्याच्या राजकारणाला छेद देणारा नेता म्हणून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची ओळख आहे. तसेच अनेकदा पक्ष व चिन्ह बदलूनही यश मिळविणारा नेता म्हणूनही पाचपुते यांची ओळख आहे. तेच पाचपुते आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या चिन्हावर व कोणत्या राजकीय पक्षातून निवडणूक लढविणार याचीच सध्या चर्चा जोमात आहे.

मागील निवडणुकीत भाजपाची लाट लक्षात घेऊन पाचपुते यांनी ऐनवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून दिली होती. पवार साहेबांनी मग त्या लाटेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याला छेद देत श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत पाचपुते यांचा पराभव केला होता. त्यावेळी पवार यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर युवा नेते राहुल जगताप यांना सहमतीचा उमेदवार म्हणून संधी दिली. माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांनीही पाचपुते यांच्या पराभवासाठी सहमतीने काम करून येथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय घडवून आणला होता.

मात्र, यंदा आमदार राहुल जगताप यांचा व राष्ट्रवादीचा करिष्मा येथे कितपत चालेल, याबद्दल पक्षाला शंका आहे. त्यामुळेच येथून जिल्हा परिषद सभापती अनुराधा नागवडे यांना घड्याळ चिन्हावर लढविण्याची तयारीही सुरू आहे. अशावेळी आमदार जगताप भाजपच्या गोटात जाऊन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जाण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जगताप यांना विखे यांनी साथ देऊन पाचपुते यांचा पराभव केला होता. तर, यंदा लोकसभा निवडणुकीत पाचपुते यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे पुत्र व भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांना साथ दिली, तर जगतापांनी आमदार संग्राम जगताप यांच्या घड्याळाला मतदान मागितले. मात्र, तरीही आमदार राहुल जगताप यांच्याकडील विखेंचा ओढा कमी झालेला नसल्यानेच यंदा जगताप यांना भाजपात घेऊन उमेदवारी देण्याची चर्चा होत आहे.

तर पाचपुते शिवसेनेत असतील..!

त्याचवेळी पाचपुते व नागवडे काय करतात, याकडेही मतदारांचे लक्ष आहे. आमदार राहुल जगताप यांना की अनुराधा नागवडे यांना राष्ट्रवादी उमेदवारी देणार याचे कोडे कायम आहे. त्याचवेळी युतीच्या जागावाटपात श्रीगोंद्याची जागा शिवसेनेकडे जाईल असेही बोलले जात आहे. अशावेळी भाजपमधील पाचपुते यांनाच तिकडे घेऊन उमेदवारी देण्याची तयारीही शिवसेनेची आहे. नगर जिल्हा शिवसेनेने त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच सर्वाधिकार दिलेले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*