विद्यार्थ्यांना शिकावे लागणार एकात्मिक शेती पद्धत..!

मुंबई :

शेतीचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जमिनीवर एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले.

मंत्रालयात आज राज्यातील कृषी विकासाकरिता कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन व भविष्यात करावयाच्या उपाययोजना याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, व दापोलीतील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या कृषी विद्यापीठांच्या संशोधनाबाबत आढावा घेण्यात आला. 

कृषी विद्यापीठात दरवर्षी जवळपास 60 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. कृषी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एकात्मिक शेती पद्धतीचे तंत्रज्ञान शिकवून त्यांना त्यांच्या जमिनीवर उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी घेतलेल्या उत्पादनाचा नियमित आढावा देखील घेण्यात येईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडे उपलब्ध जमीन, पाण्याचा साठा व उत्पादनासाठी पूरक संसाधनांची उपलब्धता लक्षात घेऊन त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री डॉ.बोंडे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर शेती अर्थशास्त्राचा अभ्यास करताना विविध क्षेत्रातील हवामान अनुकूलता, विविध भागातील जमिनींचा कस यानुसार उपयुक्त व अधिक उत्पादन देणाऱ्या महत्वाच्या पिकांचा आराखडा राज्यातील विविध क्षेत्रानुसार तयार करण्यात यावा असे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*