रस्त्यांची दुरुस्ती शिघ्रगतीने करावी : चव्हाण

मुंबई :

गणेशोत्सवासाठी  कोकणात जाणाऱ्या  भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी या मार्गावरील सर्व  रस्त्यांची शीघ्रगतीने व उत्तम पद्धतीने दुरुस्ती करावी असे आदेश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री  रर्वींद्र चव्हाण यांनी आज दिले. आगामी रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सव 2019 साठी करावयाच्या उपाययोजना तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या  अनुषंगाने करावयाच्या पूर्वतयारीचा आज मंत्रालयात आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

श्री. चव्हाण म्हणाले, रस्ते दुरुस्तीचे काम प्राधान्याने करावे, तसेच कोकणात जाणाऱ्या  एस टी महामंडळाकडून चालविण्यात येणाऱ्या  बसेस या सुस्थितीत असाव्यात, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखली जावी. गणेशोत्सवादरम्यान वीज पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घ्यावी. सणासुदी निमित्ताने येणारी मिठाई भेसळमुक्त असावी, खवा किंवा मिठाईत कोणतीही भेसळ आढळून आल्यास तत्काळ तक्रार करावी तसेच अधिकाऱ्यांनी यावर तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

            गणेश विसर्जनाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी तसेच विसर्जनासाठी असलेल्या तलावात ज्या ठिकाणी खोल पाणी असेल तिथे स्वयंसेवकांनी तैनात राहून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.  जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांना ओळखपत्रे देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. गणेशोत्सवाचा हा महोत्सव सुखरुप आणि शांततेत पार पडावा यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य करावे असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले.

यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह रस्ते विकास महामंडळ, औद्योगिक सुरक्षा, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, जिल्हा शल्य चिकीत्सक, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ, राज्य परिवहन मंडळ, आरोग्य विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*