उद्योगगाथा | फ़क़्त ‘दमानी’ नाही तर स्थिरही; वाचा ‘डी-मार्ट’ची यशोगाथा

डी-मार्ट यशोगाथा | भाग : पहिला

किराणा म्हणजे मराठी माणसांचे वाणसामान. होय, गल्लीतला किंवा जास्तीत-जास्त लांबचा विचार केला तर ओळखीचा दुकानदार शोधून त्याच्याकडून वाटेल तशी घासाघीस करून खाण्यासाठी आणलेले साहित्य म्हणजे किराणा. पण जागतिकीकरणाच्या झपाट्यात ही व्याख्या बदलून किराणा स्टोअरवरून ग्रोसरी मॉल, रिटेल शॉप किंवा शॉपिंग सेंटर यामध्येही परावर्तीत झालेली आहे. अशावेळी आपल्याला झटकन आठवतात ते रिटेल चेनचे ब्रॅण्ड म्हणजे बिग बाजार, मोअर, रिलायन्स रिटेल किंवा फ्रेश, टाटा कंपनीचे स्टार मार्केट (बाजार) आणि डी-मार्ट. होय, अनेकदा शेवटीच डी-मार्ट आठवते. कारण, त्याची जाहिरात नाही ना आपण पाहत..!

जाहिरात नाही, गाजावाजा नाही, संस्थापकांचे कुठे कार्यक्रम नाहीत, मुलाखती तर कुठेच नाहीत.. तरीही डी-मार्ट नावाची रिटेल चेन भारतात स्थिरावली आहे. नव्हे वाढत आहे. आपण नाही का इंग्रजीत म्हणत की, स्लो बट स्टेडी. हा तेच ते मराठीत दमानी आणि स्थिरही. तर, वाचकांनो, विशेष म्हणजे डी-मार्टच्या मालकांचे आडनावही ‘दमानी’ आहे. होय, डी म्हणजे दमानीज मार्ट.

राधाकृष्ण दमानी. हे नाव काही बिर्ला, अंबानी, अदानी किंवा रामदेवबाबा यांच्या पठडीतले नाही. कारण आपल्याला डी-मार्ट माहित असेल. तिथे खरेदीही केली असेल. मात्र, त्याचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांचे यांचे नाव माहित असेलच असे नाही. भारतातील सर्वाधिक यशस्वी ग्रोसरी रिटेल चेन म्हणजे डी-मार्ट. सध्या (जुलै २०१९ पर्यंत) भारतात १८६ डी-मार्ट सेंटर ग्राहकांची सेवा करीत आहेत. तेही रास्त भावात. कमी किमतीत या जगात काहीच मिळत नाही. फुकट तर नाहीच नाही. त्यामुळेच रास्त भावात किराणा खरेदीचा आनंद देणारे डी-मार्ट मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात लोकप्रिय आहे. त्याचबरोबर जयसिंगपूर (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यासारख्या छोट्या गावातही डी-मार्ट जोरात सुरू आहे. त्यासाठीचे व्हिजन घेऊन ही कंपनी राधाकृष्ण दमानी यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे.

बिर्ला, रिलायन्स, फ्युचर ग्रुप यांच्या ग्रोसरी (किराणा) चेनच्या शाखा हजारात आहेत. मात्र, व्यावसायिक दृष्टीने नफा मिळवून यशस्वी झालेली कंपनी म्हणून मुंबई शेअर बाजारात नोंद आहे ती डी-मार्टची. आता म्हणजे २००५ मध्ये अव्हेन्यू सुपरमार्केट लिमिटेड नावाने ही कंपनी सुरू झाली. शेअर बाजारातील बडे प्रस्थ असूनही प्रसिद्धीसाठी अजिबातच हपापलेले नसलेल्या राधाकृष्ण दमानी यांची ही कल्पना. खरेदीची नवी व्याख्या जाणलेल्या दमानी यांनी अजिबात घाई न करता ही कंपनी ४ हजार कोटींवर नेऊन ठेवली आहे. कारण, त्यांचा फोकस आहे कामावर आणि विश्वास आहे कंपनीच्या व्यवस्थापनावर..!

२००५ ला मुंबईत सुरू झालेली ही कंपनी इतकी मोठी कशी झाली. आता काय करते, आणि नेमकी ग्राहकांना का आपलीशी वाटते, असे प्रश्न अनेकांना असतील. हो, असायलाच पाहिजेत. दुसऱ्या भागात आताप्रमाणे अजिबातच पाल्हाळ न लावता राधाकृष्ण दमानी यांच्या डी-मार्टची यशोगाथा मांडणार आहे. तोपर्यंत वाचक म्हणून आपल्याला काय वाटते ते कळवा प्रतिक्रिया देऊन..

लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग (मो. ९४२२४६२००३)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*