उद्योगगाथा | ‘डी’ फॉर ‘दमानीज मार्ट’; वाचा ‘डी-मार्ट’ची यशोगाथा

डी-मार्ट यशोगाथा | भाग : दुसरा

‘डी’ म्हटले की भारतीयांना आठवते ती मुंबईतील (आणि आता दुबईतील) ‘डी-कंपनी’. अनेकांनी यामुळेच ‘डी’ फॉर ‘डी-गँग’, अशीच व्याख्या करून टाकली आहे. मात्र, जगात वाईट बाजूबरोबरच चांगली बाजूही असतेच की. वाईट आहे म्हणूनच तर चांगल्याला महत्व आहे. ‘डी’ शब्दाची हीच चांगली बाजूही मुंबईतूनच जगभरात विस्तारत आहे. तिचे नाव आहे ‘डी-मार्ट’..!

शेअर ब्रोकर राधाकृष्ण दमाणी यांनी काळाची पावले ओळखून २००२ मध्ये या क्षेत्रात शिरकाव केला. ग्लोबल रिटेल कल्चरला भारतात खऱ्या अर्थाने रुजविण्याचे काम ‘दमानीज मार्ट’ने केले आहे. त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम ‘अपना बाजार’चे पवईतील दुकान विकत घेऊन सुरुवात केली. मग या क्षेत्रातील भविष्य लक्षात घेऊन २००५ मध्ये ‘अव्हेन्यू सुपरमार्केट लिमिटेड’ या कंपनीची पायाभरणी करून ‘डी-मार्ट’चे दालन ग्राहकांसाठी खुले केले. आता ही कंपनी भारतीय शहरी मध्यवर्गीयांच्या मासिक यादीचाच भाग बनली आहे.

किराणा साखळी दुकाने किंवा किराणा स्टोअर्स यांच्यामध्ये ग्राहकांना सवलत सांगून काहीतरी गोलमाल केला जातो. तसा प्रकार ‘डी-मार्ट’मध्ये चुकूनही होत नाही. पुरवठादार कंपन्या व ग्राहक यांच्यामधील थेट दुवा म्हणून काम करीत असल्याने येथील ग्राहकांना किमान ३ % सवलतीत किराणा खरेदीचा आनंद मिळतो. इतर रिटेल चेनच्या दुकानातील चकाचौंध दमानी यांच्या मार्टमध्ये नसते. वातानुकुलीत यंत्रणा वगळता येथे विशेष अतिरिक्त खर्च टाळला जातो. त्याऐवजी ग्राहकांना जास्तीतजास्त सूट देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पुरवठादारांच्या खात्यात वेळेत पैसे देऊन अधिक सवलतीत माल खरेदी करण्याच्या या कंपनीच्या धोरणातुन मिळणाऱ्या सुटीद्वारे मोठ्या शहरातील ग्राहकांना हे मार्ट आपलेसे वाटत आहे.

काहीतरी भव्यदिव्य करण्यासाठी गरिबीच्या अनुभवाचे चटके घेतलेले असावेच लागतात, असल्या थाटातील वक्तव्य करून भाषणबाजीत वेळ न दवडता कंपनीच्या ग्रोथवर आणि ग्राहकांच्या समाधानावर लक्ष ठेऊन राधाकृष्ण दमाणी यांचे ‘डी-मार्ट’ सेवा देत आहे. उंची पेहराव, थाटमाट किंवा अनावश्यक चकाचौंध यात वेळ व पैसा न दवडता कामावर फोकस ठेऊन काम केल्यानेच कमी शाखा असूनही त्यांची उलाढाल ४ हजार कोटींच्याही वरती पोहचली आहे.

दुकान सुरू करायचे म्हणजे केली घाई. तातडीने न केल्यास कोणीतरी पाठीमागून येऊन पुढे जाईल. दुकान बेस्ट असायलाच पाहिजे, असेच मराठी समुदायाला वाटते. त्यापायी अनेकांनी उंची दुकाने सुरू करीत तोटा पदरात पाडून घेतला आहे. मात्र, ‘डी-मार्ट’चे वैशिष्ट्ये म्हणजे कुठेही शॉप सुरू करताना जागा भाड्याने न घेता थेट विकत घेऊनच धंदा सुरू केला जातो. ‘मॅक-डी’ अर्थात मॅकडोनाल्डस्’ आपल्याला माहित असेलच. त्यांनी हा फंडा राबवूनच जगभर विस्तार केला आहे. (‘मॅक-डी’ची यशोगाथाही लवकरच ‘कृषीरंग’वर वाचायला मिळेल) सावध पावलाने व बाजार आणि स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करूनच ‘डी-मार्ट’चे दालन सुरू केले जाते. तिथे घाई नसते, तर अभ्यासावर भर असतो.

आपण एखाद्या मोठ्या इमारतीत रिटेल स्टोअर पाहतो. मात्र, ‘डी-मार्ट’ असे कुठेही दिसत नाही. आपली ओळख पक्की करण्यासाठी जागा पूर्ण मालकीची करून घेतानाच ती संपूर्ण इमारतही ‘डी-मार्ट’चीच असेल याची काळजी घेतली जाते. दुसऱ्यांच्या मॉलमध्ये जाऊन जागा घेऊन तिथे ‘डी’मार्ट’ सुरू करण्याची घाई केली जात नाही. उलट आपणच इमारत बांधून घेऊन त्यात मार्ट सुरू केले जाते. तसेच जागा शहरातील मोक्याच्या जागीच असावी असेही नाही. मुख्य रस्त्यावर असावी इतकेच. त्यासाठी सातारा येथील ‘डी-मार्ट’चे उदाहरण महत्वाचे ठरते. येथील शॉप पुणे शहराकडे येताना दोनेक किलोमीटरवर आहे. येथे ग्राहकांना आणण्यासाठी मोफत विशेष बससेवा ही कंपनी चालविते. मात्र, तरीही ते शॉप जोरात सुरू आहे. कारण, ग्राहकांचा विश्वास पक्का आहे..!

लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग (मो. ९४२२४६२००३)

ता.क. : आमच्या उद्योगगाथा आपणास कशा वाटतात, ते नक्की कळवा. आवडत नसल्यास तसेही कळवा. सुचनांचे स्वागत…

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*