पुढच्या मंत्रिमंडळात शाळा अनुदान निकाली काढू : मुख्यमंत्री

अहमदनगर :

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीत अनुदानाचा विषय मांडला. यावर पुढच्या मंत्री मंडळात शाळा अनुदानाचा विषय तातडीने मार्गी लावण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री शेलार यांनी शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळास दिली.

या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असल्याचे शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी स्पष्ट केले.  शाळांच्या अनुदान प्रश्‍नासंदर्भात शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शालेय शिक्षण मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांना स्मरणपत्र दिले होते. यासंदर्भात शिक्षक परिषदेचे शिष्टमंडळ शेलार यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले असता त्यांनी ही माहिती दिली. यावेळी शिक्षक आमदार नागो गाणार, वेणूनाथ कडू, मा.आ. भगवानराव साळुंखे, शिवनाथ दराडे आदी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेलार यांनी तातडीने शिक्षण विभागाकडून शाळा अनुदान संदर्भात सर्व फाईल मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवल्या आहेत. त्या वित्त विभागाकडे प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले. मंत्री मंडळ बैठकीला सुरुवात होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह या विषयाकडे मंत्री मंडळाचे शिक्षण मंत्री शेलार लक्ष वेधले. अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या तसेच नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना अनुदान मिळाले पाहिजे हीच शिक्षक परिषदेची आग्रही भूमिका असून, शिक्षक वर्ग या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहे. वित्त विभागाकडून तातडीने मंजुरी मिळण्यासाठी शिक्षक परिषद प्रयत्नशील असल्याचे बाबा बोडखे यांनी सांगितले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*