महाराष्ट्राची ‘मुद्रा’ तेजीत; 84 हजार कोटींचे कर्ज वितरण

नवी दिल्ली :
असंघटीत लघु उद्योगांच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत गेल्या चार वर्षात महाराष्ट्राने 84,837 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. मुद्रा योजनेत सर्वाधिक कर्ज वितरित करणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुस-या स्थानावर आहे, तर या योजनेच्या तरुण कर्ज प्रकरणात महाराष्ट्राने देशात सर्वाधिक 24,138 कोटी रूपये कर्ज वितरण करून अव्वल स्थान राखले आहे.

एप्रिल 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत शिशु, किशोर आणि तरूण अशा तीन गटामध्ये कर्ज पुरवठा करण्यात येतो. शिशु कर्ज गटात 50 हजार रुपयांपर्यंत, किशोर कर्ज गटात 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत तर तरुण कर्ज गटात 5 ते 10 लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.

दीड कोटीहुन अधिक कर्ज प्रकरणे मंजूर

महाराष्ट्रात एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2019 या सव्वा चार वर्षाच्या कालावधीत 1 कोटी 62 लाख 5828 कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली. या कर्ज प्रकरणांसाठी आजपर्यंत 87,028 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2019 या एका वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राने 4 लाख 75 हजार कर्ज प्रकरणे मंजूर करून 27,394 कोटी रुपये प्रत्यक्ष कर्ज वितरित केले आहे.

तरूण कर्ज गटात महाराष्ट्र अव्वल

या योजनेत तरूण कर्ज गटात सर्वाधिक 5 ते 10 लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. या कर्ज प्रकारात महाराष्ट्राने एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत 3 लाख 59 हजार 840 कर्ज प्रकरणांसाठी 24,996 कोटी रुपये मंजूर केले तर प्रत्यक्षात 24,138 कोटी रूपयांचे कर्ज लाभार्थ्यांना वितरित केले आहे. देशात या प्रकारात सर्वाधिक कर्ज वितरित करुन महाराष्ट्राने सलग चौथ्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले आहे. ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2019 या एका वर्षाच्या कालावधीत राज्यांने 1 लाख 34 हजार 617 कर्ज प्रकरणे मंजूर करून 7,609 कोटी रूपयांचे कर्ज वितरित केले आहे.

शिशु कर्ज गटात 34 हजार कोटी कर्ज

शिशु कर्ज गटात एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत राज्यात 1 कोटी 44 लाख 63 हजार 970 कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली. या कर्ज प्रकरणांसाठी 35,246 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले तर प्रत्यक्षात 34,771 कोटी रुपये लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. गेल्या एक वर्षाच्या कालावधित 40 लाखांहुन अधिक कर्ज प्रकरणे या प्रकारात मंजुर करण्यात आली असुन यासाठी 10,989 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

किशोर कर्ज गटात 25 हजार कोटींचे कर्ज

किशोर कर्ज गटात 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. गेल्या सव्वा चार वर्षात महाराष्ट्राने या कर्ज गटात 13 लाख 82 हजार कर्ज प्रकरणे मंजूर केली असून यासाठी 26,785 कोटी रूपये मंजूर केली तर 25,927 कोटी रुपये प्रत्यक्षात वितरित करण्यात आले आहेत. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत 8,797 कोटी रूपये या कर्ज गटात महाराष्ट्राने वितरित केले आहेत.

गेल्या एका वर्षात 27 हजार कोटींचे कर्ज वितरण

मुद्रा योजनेत महाराष्ट्राने ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2019 या एका वर्षाच्या कालावधित सर्व कर्ज प्रकारात मिळुन 27,394 कोटी रूपयांचे कर्ज वितरित केले आहे. शिशु कर्ज गटात गेल्या एका वर्षात 10,989 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. किशोर कर्ज गटात गेल्या एका वर्षात 8,797 कोटी रूपये या कर्ज गटात महाराष्ट्राने वितरित केले आहेत, तर तरूण कर्ज गटात गेल्या एका वर्षात 7,609 कोटी रूपयांचे कर्ज वितरित केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*