उद्योगगाथा | तंबाखूपासून ते ‘सनफिस्ट’पर्यंतचा प्रवास; वाचा ‘आयटीसी’ची यशोगाथा

व्यवसाय करताना भविष्याचा वेध घेऊन अभ्यासपूर्ण पद्धतीने पावले टाकली तर मार्केटमध्ये टिकून रहाण्यासह यशाचा ‘माईलस्टोन’ही गाठाता येतो. याची साक्ष पटवून देणारी भारतीय कंपनी म्हणजे ‘आयटीसी लिमिटेड’. अनलिमिटेड क्षेत्रात काम करूनही दर्जा व विश्वासार्हता यांच्या जीवावर ही कंपनी फ़क़्त भारतीय नाही तर, आशियाई व जागतिक मार्केटमध्ये वेगळा ठसा उमटवून दिमाखात वाटचाल करीत आहे.

कोणतीही कंपनी आठवली की भारतीयांना तिचा संस्थापक किंवा विद्यमान अध्यक्ष व सीइओ यांचीही ओळख जोडीने द्यावी लागते. किंवा त्यांच्या नावानेच अशा कंपन्या ओळखण्याची भारतीयांना सवय आहे. मात्र, इथे तसे नाही. इथे संस्था मोठी आणि संचालक त्यानंतर, असेच सूत्र आहे. भारतीय उपखंडात ही वेगळ्या धाटणीची कंपनी आहे. म्हणूनच आताही या कंपनीचे चेअरमन कोण हे समजून घेण्याची किंवा देण्याची गरज नाही. कारण ते कर्तव्यदक्ष पद्धतीने आपापले काम करीत आहेत आणि कंपनीही आपल्या सकारात्मक प्रवासात आत्ममग्न आहे.

शंभर वर्षांचा अनलिमिटेड प्रवास..!

काळाची पावले ओळखून बदल केल्यास मिळणारे यश टिकणारे (शाश्वत) असल्याची साक्ष देणारी ही आयटीसी कंपनी म्हणजे पूर्वाश्रमीची इंडियन टोबॅको कंपनी. मात्र, त्यापूर्वीही तिचे नाव वेगळे होते. ते म्हणजे इम्पिरियल टोबॅको कंपनी ऑफ इंडिया. ‘इम्पिरियल टोबॅको कंपनी’ची स्थापना २४ ऑगस्ट १९१० ला झाली. १९७० मध्ये तिचे नाव ‘इंडियन टोबॅको कंपनी’ केल्यानंतर पुन्हा १९७४ मध्ये नावात बदल करून ही कंपनी ‘आयटीसी लिमिटेड’ झाली. अनलिमिटेड क्षेत्रात काम करण्यासाठी..!

विश्वासाचा आशीर्वाद घराघरात..!

‘योगेश चंदर देवेश्वर’ हे सर्वसामान्य भारतीयांना माहित असेलच असे नाही. त्यांच्या ‘आयटीसी’चेही नाव माहित असेलच असेही नाही. मात्र, तुम्हाला त्यांचे ब्रँड नक्कीच माहित असतील. आताचे चेअरमन संजीव पुरी हेही आपल्याला माहित नसतात. पण त्यांच्या कामाला आपण विश्वासाची पोहोचपावती दररोज देत असतो. आशीर्वाद आटा, सनफिस्ट बिस्किट, बिंगो वेफर्स, किचन ऑफ इंडियाच्या चटण्या व सॉस, यीप्पी न्युडल्स आणि पास्ता, बी नॅचरल्सचे ज्यूस, मिंटोची फ्रेशनेसदायी गोळ्या व चॉकलेट, कॅन्डीमॅन किंवा गुमोन च्युइंगम, विवेल साबण, एंगेज डीओ, सॅव्हलाॅन सोप व हँडवाॅश, क्लासमेटच्या वह्या व पेन, ऐम व होम लाईट माचीस, मंगलदीप अगरबत्ती व धूप यापैकी कित्येक प्रोडक्ट्स आपण नियमितपणे घरात वापरतो ना..? या पदार्थांची खरेदी व वापर म्हणजेच आयटीसीच्या कामाची खरी पोहोच आहे..!

एफएमसीजी, हॉटेल्स, पेपर, पॅकेजिंग, अॅग्री बिजनेस व इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. १९९६ चा विल्स ब्रँड स्पाँसर क्रिकेट वर्ल्ड कप आठवतोय. काहींना आठवत असेल. होय, विल्स म्हणजे सिगारेट ब्रँड. तो आहे याच कंपनीचा. नव्हे इंडिया किंग्ज, गोल्ड फ्लेक, कॅप्स्टन, बर्कले, ब्रिस्टॉल, विल्स, क्‍लासिक/माईल्ड, क्‍लासिक अल्ट्रा व इतर अनेक नावांनी ही कंपनी फुक्कीबहाद्दर मंडळींची सेवा करीत आहे. त्यातही आपला क्लास टिकवून ठेऊन आहे ही कंपनी. शेजारील श्रीलंकेत वेलकम ग्रुपची हॉटेल किंवा आयटीसी मौर्या, राजपुताना, विंडसर, ग्रॅंड चोला, ग्रॅंड सेंट्रल, मराठा ग्रॅंड भारत, शेरेटन-दिल्ली, बेंगळुरूचे गार्डेनिया इत्यादी पंचतारांकित हॉटेल्स या उद्योगसमूहाची आहेत.

‘ई-चौपाल’द्वारे ‘मिशन सुनहरा कल’

‘ई-चौपाल’ नाव ऐकलेय ना..? होय तेच ते ‘मिशन सुनहरा कल’वाले..! शेतीच्या क्षेत्रातील एक महत्वाचा जगप्रसिद्ध उपक्रम. ६ हजारपेक्षा जास्त केंद्रांद्वारे २५ हजारापेक्षा जास्त खेड्यामधील सुमारे ४० लाख शेतकऱ्यांना जोडणारा दुवा म्हणजे ई-चौपाल. डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांना सर्व प्रकारची माहिती पुरवणे, ई-ट्रेडिंगसारखी सोय उपलब्ध करू देणे, पिकांची स्थिती लक्षात घेऊन हवामान आधारित पिक सल्ला देणे, बाजारभाव व आवक यांची माहिती देण्याचे काम या चौपालवर केले जाते.

सुमारे १०५ पेक्षा जास्त उपकंपन्या आयटीसी ग्रुपच्या आहेत. यत्र.. तत्र.. सर्वत्र… असतानाही ही कंपनी दर्जा, गुणावता व सेवाभाव यामध्ये कसूर करीत नाही. जे द्यायचे ते उत्तम नव्हे सर्वोत्तम. याच भावनेने काम केल्याने आता १०० वर्षांनंतरही ही कंपनी टिकून आले. तिची उत्तरोत्तर वृद्धी होत आहे.

लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग (मो. ९४२२४६२००३)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*