पाच वर्षात 16000 किमी रस्त्यांची कामे

मुंबई :

राज्यात गेल्या पाच वर्षात 16 हजार 554 किमी लांबीच्या रस्त्यांची आणि 1209 किमी पुलांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. गेल्या पाच वर्षात 35 हजार 219 किमी रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

गेल्या पाच वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, राष्ट्रीय मार्गाची कामे वेगाने सुरु केली आहेत. रस्त्यांचा दर्जा सुधारल्यानंतर त्याची देखभाल व्यवस्थित व्हावी, यासाठी केंद्र शासनाप्रमाणे हायब्रिड ॲन्युइटी तत्त्वाचा वापर राज्यात करण्यात येत आहे. हायब्रिड ॲन्युइटी या प्रणालीचा वापर करून गेल्या दोन वर्षात 8654 किमी रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. या प्रणालीमध्ये दहा हजार किमी रस्त्यांची दुरुस्ती, रुंदीकरण आणि सर्व्हिस रोडची कामे दोन वर्षाच्या कालावधीत करण्यात येणार आहेत.

हायब्रिड ॲन्युइटीमध्ये शासनाचा सहभाग 60 टक्के असून 10 वर्षाच्या कालावधीत ॲन्युइटीच्या स्वरुपात 40 टक्के रक्कम देण्यात येते. प्रकल्पाच्या सवलत कालावधीमध्ये देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदारावर असणार आहे.

श्री. पाटील म्हणाले, रस्ते वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक रस्त्यांवर दिवसेंदिवस वाहनांची संख्या व त्यात अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी हायब्रिड ॲन्युइटी प्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*