‘प्रज्ज्वला’च्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण

नागपूर : 

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये बचत गटांची भूमिका महत्वाची असून महिला आयोगाने सुरु केलेल्या प्रज्ज्वला योजनेमुळे महिला रोजगारासह आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम होतील,  असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

महिला बचत गटांसाठी राज्य महिला आयोगातर्फे प्रज्ज्वला योजना  प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कामठी येथील पंकज सभागृहात आयोजित कार्यक्रमात  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर उपस्थित होत्या. यावेळी महिला आयोगाच्या प्रवक्ता श्रीमती निता ठाकरे, माजी महापौर श्रीमती अर्चना डेहनकर, प्रज्ज्वला योजना प्रशिक्षक श्रीमती दिपाली मोकाशी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, महिला आयोगाच्या श्रीमती कपालिनी सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,महिला बचत गटांची आर्थिक, सामाजिक व कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून प्रज्ज्वला योजना राबवण्यात येत आहे. महिलांना स्वतःची प्रतिमा निर्माण करायची आहे. महिलांना मदत करणे, कौटुंबिक वाद निपटणे यापुरतेच महिला आयोगाचे काम मर्यादित नाही. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, महिलांना अर्थसंपन्न होता यावे यासाठी प्रज्ज्वला योजना अत्यंत महत्वाची असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यामध्ये सुमारे ३ लाख बचत गट असून त्यांच्याशी सुमारे साठ लाख महिला जोडलेल्या आहेत. हे बचत गट आर्थिक सक्षमीकरणाचा कणा असल्याने आयोगाने बचत गटांना आणखी सक्षम करण्यावर भर दिला आहे. प्रज्वला योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असून दुसऱ्या टप्प्यात ‘एक जिल्हा, एक वस्तू’ असे क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहेत.  त्यातून प्रत्येक जिल्ह्याला एक ओळख आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल.  तिसऱ्या टप्प्यात बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यासाठी ‘बचत गट बाजार’ जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.

या योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचे सहकार्य लाभल्याचे श्रीमती विजया रहाटकर यांनी यावेळी सांगितले .

आतापर्यंत प्रज्ज्वला प्रशिक्षण कार्यक्रम नागपूरप्रमाणेच नंदुरबार, धुळे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, अहमदनगर, नांदेड, परभणी, जळगाव,अकोला, वाशीम, पालघर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, लातुर, सोलापुर, बीड, मुंबई, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात झाले आहेत.                 

यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजना उपस्थित महिलांना समजून सांगितल्या. तसेच महिलांच्या संरक्षणासाठी तसेच विकासासाठी राज्य शासन तसेच केंद्र शासनाने तयार केलेल्या कायद्याविषयी सखोल माहिती दिली. या कार्यक्रमात प्रत्येक महिलांना एक कीट देण्यात आली. त्यामध्ये योजना तसेच कायदे याविषयी माहिती देणाऱ्या पुस्तिकांचा समावेश होता. त्या पुस्तिकांचा महिलांनी जाणीवपूर्वक अभ्यास करावा, तसेच  कुठेही महिलांवर अत्याचार झाला तरी  राज्य महिला आयोग  प्रत्येक महिलेच्या पाठीशी  उभे  असून पीडित महिलेने भीती मुक्त होऊन स्थानिक यंत्रणेकडे दाद मागण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वित्त, नियोजन, विशेष सहाय्य, वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा संदेश उपस्थित महिलांना दाखविण्यात आला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

काय आहे प्रज्ज्वला योजना?

राज्यामध्ये सुमारे 5 लाख बचत गट कार्यरत असून त्यांच्याशी सुमारे 1कोटी 10 लाख महिला जोडलेल्या आहेत. बचत गट आर्थिक सक्षमीकरणाच्या कणा असल्याने आयोगाने बचत गटांना आणखी सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यातून प्रज्ज्वला योजना आकारास आली आहे. प्रज्ज्वला योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात महिला बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एक जिल्हा एक वस्तू अशी क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येक जिल्ह्याला एक ओळख आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. तिसऱ्या टप्प्यात बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळवण्यासाठी बचत गट बाजार, जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन आहे, अशा पद्धतीने प्रज्ज्वला योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*