Blog | ते सिनेमावाले ‘आरे ला कारे’ करणार का..?

पर्यावरण हा बॉलिवूड व मराठी फिल्म इंडस्ट्री यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. सामाजिक, आर्थिक व राजकीय विषयावर नाही ते कधीही बोलत. त्यावर मूग गिळून बसण्याची भारतीय सिनेमाची परंपरा आहे. काही अपवाद वगळता (त्यांची नावे घेण्याची ही जागा नसल्याने टाळतो) सर्वांनीच या प्रमुख विषयात नाही विशेष रुची दाखविली. पण पर्यावरण हा मुद्दा तर त्यांच्या न बोलण्याच्या परंपरेत नाही ना..?

मग तरीही ही सिनेमात काम करणारी, कथा-कविता-कादंबऱ्या लिहिणारी मंडळी आरे फॉरेस्ट वाचविण्यासाठी का पुढे येत नाहीत. नाम असो की पाणी असल्या फाउंडेशनने जलयुक्त शिवार अभियानाच्या वाईटावर योग्य पांघरूण घेतलेच ना? शेतकरी आत्महत्या या विषयाची तीव्रता कमी केलीच ना? त्यांचे काम उत्तम आहे. महाराष्ट्रातील गावोगावी पाणीदार शिवार अभियान या संस्थांनी राबविले व यशस्वी केले. पण मुंबईतल्या जंगल राक्षणला त्यांनी पुढे न येण्याचे कारण काय?

मात्र, इतका पर्यावरण, पाणी व जंगल रक्षणाचा ध्यास घेतलेल्या या संस्था त्यांच्याच मुंबईत आरे जंगल वाचवायला का पुढे येत नसतील? की सिनेमात काम करून कुठे फुटेज खायचे आणि कुठे नाही, याचे नाटकी भान घेऊनच पाणीदार गावाची चळवळ दमटली जात नाही ना? तसे असल्यास त्यांची ‘आरे’वरील चुप्पी बरोबरच आहे. मग त्यावर काहीच बोलायला नकोय..

काही मूठभर मुंबईकर आरे जंगल वाचवायला लढत आहेत. #saveAarey नावाचा सोशल मीडिया ट्रेंड सेट करीत आहेत. अशावेळी सडेतोड भूमिकेसाठी सुप्रसिद्ध असलेले नाना पाटेकर, मराठी सुपरस्टार मकरंद अनासपुरे, मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान, प्रखर देशप्रेमी सिनेमाचा अभिनेता अक्षय कुमार, ‘बीइंग ह्युमन’वाला सलमान खान, बिग बी अमिताभ बच्चन, ‘रेड चिलीज’वाला शाहरुख खान, सडेतोड अभिनेत्री कंगना राणावत… अशी किती नावे घेणार? बास करतो आता..! यापैकी एकानेही किंवा इतरांनी कोणीही ‘सेव्ह आरे फॉरेस्ट’ला का पाठिंबा दिला नसेल?

पर्यावरणप्रेमी असूनही आपल्या शेजारच्या जंगलावर सरकारी कुऱ्हाड फिरत असताना ते नेमके का गप्प असतील? अमच्यासारखेच कोडगे झाले असतील की कोणाला भीत असतील? नेमके काय झाले असेल त्यांची दातखीळ बसायला? मी पर्यावरण संवर्धवनावर काम करून मानसिक समाधान मिळवतो, असे सांगणारे कोणीही अभिनेत्री व अभिनेता का म्हणून मुंबईत जंगल वाचवायला पुढे आले नसतील? नेमके का?

सिनेमात काम करून नाटकं करण्यापेक्षा काहीजण मुंबईकर सरकारच्या दडपशाही धोरणाला अहिंसक मार्गाने विरोध करीत आहेत. काही चिमुरडी पोरं जंगल वाचवायला धडपडत आहेत. त्यांचे धाडस व जिद्द वाखाणण्याजोगी आहे. त्याला नाटक, सिनेमा, लेखक व संस्कृतिक क्षेत्रातील काही मंडळींनी साथ दिल्यास ही चळवळ नक्कीच यशस्वी होईल. मुंबईला प्राणवायू देणारा आरे नावाचा हा झरा अटणार नाही..!

चांगल्यासाठी ‘आरे ला कारे’ करायला कधी शिकणार हा भारत देश? नागरिकशास्त्र आणि सामाजिक अभ्यास कमी पडल्याने पर्यावरण रक्षणाचे भान सुटले आहे का या भारताचे? मुंबईकर म्हणजे अन्याय सहन करणारे यंत्र बनले आहे का? इतर ठिकाणी मेट्रो कार शेड नाही होऊ शकत का, असा प्रश्न विचारायला, त्यासाठी लढायला कोणाची ताकद पाहिजे त्यांना? नेमकी कशाची भीती आहे त्यांना..?

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*