मंत्री शिंदे यांच्यासमोर आव्हान; रोहित पवार करतायेत ग्राउंडवर काम

अहमदनगर :

लोकसभा निवडणुकीचे वारे आता शांत झाल्यावर नगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. त्यातही कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील घडामोडी राज्यस्तरीय चर्चेत आहेत. येथून मंत्री राम शिंदे यांना पवार कुटुंबातील सदस्य व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी आव्हान दिल्याने ही चर्चा होत आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ असल्याचे निकालातून वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. तरीही त्या जागेवरून नशीब अजमावण्याचे धाडस माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे संस्थापक-अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित यांनी केल्याचे या भागात मोठे कौतुक आहे. रोहित पवार यांनी सर्वसामान्य मतदार व कार्यकर्ते यांच्या भेटीगाठीवर भर देत येथून विजयासाठीची पायाभरणी केली आहे. त्याचाच धसका घेऊन मंत्री राम शिंदे यांनी आता मतदारसंघात तळ ठोकून राहतानाचा विविध मंत्र्यांना बोलावून उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमांवर भर दिला आहे.

येथील मराठा, धनगर व ओबीसी समाजातील मतदान फुटीचा चाणाक्षपणे उपयोग करून भाजपने मतदारसंघावर पकड मजबूत ठेवली आहे. मागील निवडणुकीत कॉंग्रेसच्या विरोधी लाटेत त्यामुळेच आणखी मतदान मिळवत शिंदे यांनी विजय मिळवला. यंदा ते सगळे गणित कितपत लागू होणार, यावर शिंदे यांचा विजय अवलंबून राहणार आहे. रोहित पवार यांनी ग्राउंडवर जाऊन मतदार व नवे कार्यकर्ते पक्षाला जोडल्याने यंदाची हवा वेगळी असल्याचे मतदार सांगतात. मात्र, ही हवा बदलणार की वेगळ्या दिशेने जाणार, यावर येथील विजयाचे गणित ठरणार आहे.

मागील (२०१४) निवडणुकीत येथे तिरंगी लढत झाली. त्यात आमदार शिंदे यांचा ३७,८१६ मतांनी दणक्यात विजय झाला. मात्र, त्यांच्या विरोधातील मतदानाचा आकडा थेट लाखावर गेला. त्यामुळेच एकास-एक लढतीत रोहित पवार यांना संधी असल्याचे मतदार बिनदिक्कत सांगतात. मात्र, राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषाताई गुंड यांनी बंडखोरीची भाषा केल्याने त्याचेही अनादाज मांडले जात आहेत.

२०१४ च्या निवडणूक निकालाची स्थिती

पक्षाचे नाव      उमेदवार           मतदान
भाजप         राम शिंदे         84,058 
शिवसेना        रमेश खाडे         46,242 
राष्ट्रवादी       जयसिंहराव फाळके       46,164 

२००९ मध्ये होते गोंधळाचे वातावरण

२०१४ च्याही उलटी परिस्थिती आणि गोंधळाचे निकाल २००९ मध्ये लागले होते. त्यावेळी राम शिंदे हे ४२,८४५ मतदानासह विजयी झाले होते. त्यावेळी येथे सहाजणांमध्ये लढत झाली होती. त्यात कॉंग्रेसचे बापूसाहेब देशमुख यांना ३२,६१३ मतदान मिळाले होते. तर, अपक्ष असलेल्या प्रा. मधुकर राळेभात यांना २८,५०८, जयसिंगराव (राजेंद्र) फाळके यांना १८,९०४, प्रवीण घुले यांना १७,०५७ आणि अंबादास पिसाळ यांना १५,५८६ मतदान मिळाले होते.

यंदा मतदारांना गोंधळात टाकण्याची कोणती खेळी कोण कशा पद्धतीने खेळतो, त्याला कोणाची कशी साथ मिळते, यावर येथील विजयाचे गणित ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*