राज्यव्यापी संपाची दखल; शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन

अहमदनगर :

शिक्षक, शिक्षकेतर, शिक्षणसेवक, वस्तीशाळा शिक्षक, आदिवासी, ग्रामविकास विभागातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विविध शिक्षक संघटनांच्या वतीने राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. या संपात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद देखील सक्रीय सहभागी झाले होते. या संपाची तातडीने दखल घेत शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन सदर प्रश्‍नासंदर्भात चर्चा केली. तर शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात सोमवार दि.9 सप्टेंबर रोजी झालेल्या या बैठकीसाठी शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे, निरंजन गिरी आदींसह शिक्षक परिषदेचे व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर, शिक्षण सेवक, वस्तीशाळा शिक्षक, आदिवासी, ग्रामविकास विभागातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न शासन दरबारी रेंगाळत आहेत. शासन निर्णयाची अंमलबजावणी योग्य रितीने करण्यात येत नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढतच असल्याचे शिवनाथ दराडे यांनी बैठकित निदर्शनास आणून दिले. शिक्षणमंत्री शेलार यांनी प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी शासकीय अधिकार्‍यांना निर्देश दिले.

या बैठकित राज्यातील सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 2005 पूर्वी लागलेले व 2005 नंतरही लागलेल्या कर्मचार्‍यांना ज्या दिवसापासून सेवेत आहे. त्या दिवसापासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासामार्फत महालेखाकार महाराष्ट्र राज्य यांच्याकडे फाईल पाठवण्यात येवून तसे धोरण तयार करण्याचे, राज्यातील रात्रशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना पूर्णवेळ वेतनश्रेणी, पेन्शन योजना लागू करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्‍वासन बैठकित देण्यात आले. तसेच राज्यातील आयसीटी शिक्षकांना शासकीय सेवेत कायम करण्यासंदर्भात, राज्यातील सर्व विभागातील दिवसशाळा व रात्रशाळा मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कॅशलेस मेडिकल योजना लागू करण्यासाठी, राज्यातील अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे तात्काळ समायोजन करण्यात येवून रिक्त जागी नेमणुकीस परवानगी देण्या संदर्भाचा तसेच 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने रक्कम अदा करण्यात यावी, राज्यातील अनुकंप भरती तात्काळ व विनाअट करण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे शालेय शिक्षणमंत्री शेलार यांनी आश्‍वासन दिले. या निर्णयाचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले असल्याचे बाबा बोडखे यांनी सांगितले आहे. या मागण्या पुर्ण होण्यासाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, सर कार्यवाह नरेंद्र वातकर, कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, संजय येवतकर, निरंजन गिरी, रमेश चांदूरकर, शिवनाथ दराडे, विलास सोनार, दिलीप आवारे, वैशाली नाडकर्णी, प्रकाशचंद्र मिश्रा, कदम सर, नरेश धोत्रे, भारत काकड आदी प्रयत्नशील आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*