
अहमदनगर :
अतिरिक्त कामाच्या दडपणाखाली असलेल्या जिल्ह्यातील आरोग्यसेविका आंदोलनाच्या पवित्र्यात असून, नुकतीच आरोग्य सेविकांच्या जिल्हा कार्यकारणीची बैठक कास्ट्राईब महासंघाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकित आरोग्यसेविकांना दिलेल्या कामाव्यतीरिक्त इतर कामे देणे बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीसाठी स्वाती चौधरी, मनीषा सुवर्णा साळवे, सुवर्णा वांडेकर, ज्योती भोसले, दिपाली चौधरी, इंदू गोडसे, आशा बनसोडे, अर्चना काशीद, संध्या शिंदे, निर्मला नेहे, संगीता सोनवणे, शोभा सोनवणे आदींसह आरोग्यसेविका प्रतिनिधी उपस्थित होते. कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष के.के. जाधव यांनी आरोग्यसेविकांवर अन्याय केला जात असून, त्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी क्रास्टाईब महासंघ त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेविका (एएनएम) यांच्यावर अतिरिक्त कामे लादली जात आहे. त्या प्रचंड तणावाखाली असून, त्यांच्यावर अन्याय होत आहे. येणार्या प्रत्येक नवीन योजनेचा भार आरोग्यसेविकांवरच लादला जातो. या योजनांच्या 100 टक्के उद्दीष्टपुर्तीसाठी वरिष्ठांकडून आरोग्यसेविकावर दबाव टाकला जातो. आरोग्य सेविकाचे काम हे माता-बाल संगोपन (एमसीएच) आहे. तरी त्यांच्याकडून साथरोग आरसीएच, एनसीडी तसेच सर्व प्रकारचे ऑनलाईनची कामे करुन घेतली जात आहे. ही अतिरिक्त कामे करून आरोग्य सेविकांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेविकांचे अतोनात हाल चालू असल्याचा सूर या बैठकित उमटला.
बर्याच ठिकाणी आरोग्य सेविकांचे पदे रिक्त असून, दोन ते तीन उपकेंद्राचा चार्ज एका (एएनएम) आरोग्य सेविकेकडे सोपविण्यात आलेला आहे. तसेच पीएचसी ला दिवस-रात्र ड्युटी करावी लागते. तसेच एनसीडी चे ऑनलाईनचे कामे न करता, साथरोगचे कामे आरोग्य सेवक व आशा यांना देण्याची मागणी आरोग्यसेविकांच्या वतीने करण्यात आली आहे. एएनएमची असणारी कामे कोणी करू शकत नाही. ती कामे त्यांनाच करावी लागतात. गरोदर महिलांची काळजी घेणे, त्यांची प्रसूती करणे, माता व बाळाचे लसीकरणाचे सर्व कामे आरोग्यसेविकांना करावे लागतात. इतर कामे देऊन त्यांच्यावर मानसिक दबाव व दडपण आनण्यात आले आहे. त्यांच्यावर लादलेली अतिरिक्त कामे कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्ह्यातील आरोग्यसेविकांनी दिला आहे. तसेच हे प्रश्न सोडविण्यासाठी आरोग्यसेविकांची स्वतंत्र संघटना उभी करण्याचा बैठकित निर्णय घेण्यात आला.
Be the first to comment