गंगाखेड विधानसभा मतदार संघात होणार चुरशीची लढत..!

परभणी (आनंद ढोणे पाटील) :

जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा हा श्रीमंत उमेदवारांचा मतदार संघ म्हणून सर्वदूर परिचीत आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पैशांचा चुराडा येथील निवडणुकीत होत असल्याच्या चर्चा नेहमीच असतात. यंदाची विधानसभा निवडणूक त्यास अपवाद ठरणार नसल्याने येथे यंदाही चुरशीची लढत अपेक्षित आहे.

विधानसभा निवडणूकीचे वारे येथे जोमाने वाहण्यास प्रारंभ झाला असून मात्तबर नेत्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी चांगलीच कंबर कसली असल्याने येथील निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. श्री संत जनाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गंगाखेड नगरी विधानसभा मतदार संघात प्रथम शेकापचे भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांच्या निडर लोकनेतृत्वाखाली शेकापचे भाई ज्ञानोबा हरी गायकवाड हे तब्बल वीस वर्ष या मतदार संघाचे आमदार राहीले. “साधी राहणी आणि उच्च विचारसरणी” या पध्दतीची वर्तणूक असणा-या भाई ज्ञानोबा गायकवाड यांनी गोरगरीबांची अखंड सेवा केली. स्वत: मात्र काहीच न कमवता झोपडीत राहीले. त्यानंतर येथे भाजपचे कै. विठ्ठलराव गायकवाड हे निवडूण आले. त्यांनी पाच वर्षाच्या काळात पेठशिवणी येथे भव्य अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुतगिरणीची निर्मीती केली. ती अनेक वर्ष चालू राहीली गायकवाडांच्या आकस्मिक निधणानंतर तिच्याकडे दूर्लक्ष झाल्याने ती आता बंदच आहे.

माजी आमदार तथा अभ्युदय बॅऺकेचे चेअरमन सिताराम मामा घनदाट यांनी येथील स्थानिक निवडणुकीचे समीकरण खऱ्या अर्थाने बदलून टाकले. अहमदनगर जिल्यातील पारनेर तालुक्यातील जन्मभूमी आणि मुंबईची कर्मभूमी असलेल्या घनदाट मामांनी येथे आपली चांगली पकड बसविली आहे. त्यांनी समाजकार्याची चांगली मुहूर्तमेढ रोवत गावागावातील मंदिर बांधकामे, रस्ते, पाणी, आरोग्य, विज, गोरगरीब जनतेच्या मुलामूलींचे सामूहिक विवाह सोहळे, गोदावरी नदीवर डिग्रस बंधारा निर्मीती, मतदार संघातील शेतक-यांच्या सुशिक्षित युवकांना बॅऺकेत नौकरी असे आदी विकास कामे करुन या मतदार संघाचे तिन वेळा नेतृत्व केले. २०१४ च्या निवडणूकीत ते राष्ट्रवादीचे डॉ. मधूसूदनजी केंद्रे यांच्याकडून पराभूत झाले.

सध्या येथे विकासाला खिळ बसल्याची भावना नागरिक सर्रास व्यक्त करतात. विद्यमान आमदार केंद्रे यांनी गत पाच वर्षात कोणतेही विकासाचे ठोस असे कार्य न केल्याने त्यांना आगामी निवडणूकीस सामोरे जाणे कठीण जाणार आहे. तरीही त्यांची तयारी जोरात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता आणि निवडणूक कार्यक्रम हा १५ ते २० सप्टेंबर २०१९ दरम्यान जाहीर होवून आॅक्टोबर महीन्यात मतदान होणार असल्याने या मतदार संघातील संभाव्य उमेदवारांनी कार्यकर्ते जोडण्याच्या कामात भर देणे चालू केले आहे. यात, सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ मुरकूटे हे सध्या आघाडीवर आहेत. त्यांनी आपल्या मित्र मंडळाच्या माध्यमातून मतदार संघातील पूर्णा, पालम, गंगाखेड या तिनही तालूक्यात पदाधिका-यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली आहे. त्याचबरोबर त्यांनी मतदार संघातील ज्या शेतक-यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्यात अशांच्या वारसांना, अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना भरीव आर्थिक मदत देत त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचे पालकत्व घेणे, भव्य सामूहिक विवाह सोहळे, टंचाई ग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याचे टॅऺकर पुरवठा, आवश्यक तेथे बोअरवेल व मोटार पाइपलाइनची कामे स्व: खर्चातून केली आहेत. गरीबांना आवश्यक तेथे ” जिथं कमी तिथं आम्ही” या सामाजिकतेच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर हात मदतीचा देणे चालूच असून निष्कलंक उच्च शिक्षीत नवीन चेहरा असल्याने मुरकूटे यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

त्याचबरोबर यावेळेस माजी आमदार घनदाट हेही निवडणूक मोठ्या ताकदीने लढवणार असल्याचे बोलले जाते. रासपचे डॉ. रत्नाकर गुट्टे हे मागच्या निवडणूकीत अवघ्या थोडक्या मताने पराभूत झाले होते. या निवडणूकीत नक्की बाजी मारुच या आशेने त्यांच्या वतीनेही तयारी चालू आहे. परंतु, त्यांनी साखर कारखाना कामी शेतक-यांच्या नावे परस्पर कर्ज उचलल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे ते तुरुंगात आहेत. त्यामुळे ते जामीनवर बाहेर आल्याशिवाय त्यांच्या निवडणूक लढण्याचे काही खरे नाही. यासह विद्यमान आमदार डाॅ. केंद्रे यांनी देखील परत मलाच राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार असे सांगत भेटीगाठीवर भर देणे चालू केलेय. राष्ट्रवादीकडून मराठा कार्ड म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय कदम यांनीही तर गत सहा महिन्यापासून आरोग्य शिबीराच्या माध्यमातून जोमदार संपर्क वाढवीला आहे.

तसेच भाजपाकडून सभापती बालाजी देसाई, विठ्ठलराव रबदडे, गणेशराव रोकडे, श्रीराम मुंडे, लिंबाजीराव भोसले हे ईच्छूक आसून संतोष भाऊ मुरकूटे देखील प्रयत्नात असल्याचे समजते. तर, शिवसेनेतर्फे जिल्हा प्रमूख विशाल कदम, गंगाखेड मार्केट कमीटीचे सभापती बाळासाहेब निरस हे मागणी करीत आहेत. परंतू सेना भाजपाची युती होते की नाही, हे स्पष्ट झाल्यावर चित्र वेगळे असणार आहे. या पध्दतीने या ईच्छूक उमेदवारांनी मतदार संघात भेटीगाठीचे कार्य चालू केले आहे. एकंदरीत या मतदार संघात पैशाचा वारेमाप खर्च होणार. त्यावरच विजयाचे गणित ठरणार हे मात्र नक्कीच आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*