मंत्री शिंदे यांचा भेटीगाठीवर भर; जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी

अहमदनगर :

निवडणूक व्यवस्थापन व विजयाची रणनीती यामध्ये भाजपचा हातखंडा आहे. त्याच भाजपला आव्हान देताना मग इतर पक्षाच्या विरोधी उमेदवारांची दमछाक होते. यंदा अशीच विरोधकांची दमछाक करून विजय मिळविण्याची तयारी भाजपचे मंत्री राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात सुरू केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीमचे खांदे शिलेदार म्हणून मंत्री शिंदे यांची ओळख आहे. यंदाही महाजनादेश यात्रेत मतदारसंघातील सभेत मुख्यमंत्र्यांनी पुढच्या मंत्रिमंडळात शिंदे यांना दमदार मंत्री देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी मताधिक्य देण्याची अट टाकायला मुख्यमंत्री विसरले नाहीत. एकूणच यामुळे मंत्री शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे. ते उत्साहाने प्रचाराला लागले आहेत. तर, मंत्री शिंदे यांनीही वैयक्तिक गाठीभेटी वाढवून पाया आणखी भक्कम करण्याची तयारी ठेवली आहे.

यंदा येथून राष्ट्रवादीतर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. त्यांना पक्षातील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषाताई गुंड यांनी थेट आव्हान देत उमेदवारीची चुरस वाढविली आहे. तर, कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राउत यांनी मंत्री शिंदे यांना आव्हान देत भाजपकडून उमेदवारी मागितली आहे. हे दोघेही निवडणूक रिंगणात उतरल्यास राष्ट्रवादीला येथून विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राज्य भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थानिक यंत्रणा या मंत्री शिंदे यांच्या जमेच्या बाजू आहेत. खासदार सदाशिव लोखंडे यांच्यानंतर राम शिंदे यांनी येथून भाजपची मोठी ताकद उभी केली आहे. त्याच जीवावर येथून भाजपचा विजय होतो. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती यंदा करण्याचे आव्हान टीम फडणवीस यांनी स्वीकारल्याची चर्चा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*