Blog | बाळासाहेब थोरात : एक राजहंस

महाराष्ट्रातील राजकारणाची आजची परिस्थिती पाहता सर्वात जास्त अभिमान कशाचा वाटत आहे तर साहेब आम्ही तुमचे कार्यकर्ता असल्याचा अभिमान वाटतो..!!

शेवटी राजकारणामध्ये सत्ता हेच ध्येय असेल तर मग विचार, आचार, पक्ष याला किंमत राहणार नाही, कोणीही कोणत्या पक्षात गेले काय आणि कोणी काहीही विचार मांडले याला महत्वच राहणार नाही.

आज भाजप देशात सर्वात मोठा पक्ष म्हणून उभारतोय पण हाच भाजप 1989 साली फक्त 2 खासदारांचा पक्ष होता. अनेकांनी तेव्हा जर पक्षाचा विचार केला नसता तर आज भाजप सत्तेत आला असता का ?
म्हणूनच निष्ठावान कार्यकर्ता मग तो कुठल्याही पक्षाचा, विचारांचा असो तो आपले आचार, विचार एखाद्या पणती प्रमाणे जळत तेवत ठेवत असतो तोच कोणत्याही पक्षाचा कणा असतो.

मी मागे वाचले होते मा. नितीन गडकरी हे एकदा ए.बी.वर्धन यांना नागपुरातील घरी एकदा भेटायला गेले होते, अनेकांच्या भुवया त्या वेळी उंचावल्या होत्या. ते का गेले बरं एका कम्युनिस्ट नेत्याकडे ? तर आपले विचार शेवटपर्यंत जपायचे, लोकांपुढे मांडायचे हे वाटते तितके सोपे नसते, ती एक तपश्चर्याच असते यालाच तर राजकारणात किंमत असते. म्हणूनच एक प्रामाणिक कार्यकर्त्याला दुसऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याचे महत्व समजते.

शेवटी इतिहास कोणाचाही लिहिला जात नाही ? इतिहास रामशेज किल्यावर एकाकी झुंज 6 वर्ष देणाऱ्या 600 मावळ्यांचाच लिहिला जातो ना कि अवाढव्य मोगल सैन्याचा, इतिहास तर चाकणच्या भुईकोट किल्ला शाहिस्तेखानाच्या अफाट सैन्यापुढे 55 दिवस तेही 300/350 मावळ्यांच्या साथीने लढणाऱ्या फिरंगोजी नरसाळाचा लिहिला जातो.

त्यामूळेच साहेब आज परिस्थिती बिकट आहे, लोकं म्हणतात काँग्रेस संपल्यात जमा आहे, अशा अवस्थेतही आपण आपल्या शांत, संयमी अत्यंत सालस पद्धतीने काँग्रेसच्या विचारांची पाठराखण करण्यात निकराची लढाई करतांना दिसत आहे. तुम्हालाही जाता येत होते की कुठल्याही पक्षात, अगदी कोणीही आनंदाने तुम्हाला स्विकारले असते, मंत्रीपद ही मिळाले असते पण…. इतरांत व तुमच्यातील हाच फरक आम्हाला व तमाम महाराष्ट्राला आज दिसत आहे.

म्हणूनच आज महाराष्ट्रात अभिमानाने सांगावे वाटते की आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत. एक विचार, एक आचार कशा पद्धतीने तेवत ठेवावा, स्वाभिमान, निष्ठा कशी असावी हेच तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवीत आहे.

अगदी विरोधी पक्षातील नेतेही तुमच्या या निष्ठेबद्दल विचार करीत असतील कारण शेवटी समोरचा पक्ष सुद्धा विचारांच्या बांधिलकीवरच तर इथ पर्यंत पोहचलेला आहे ना? प्रामाणिक कार्य करणाऱ्यांची, निष्ठेने आपले विचार शेवट पर्यंत जपणाऱ्यांचाच इतिहास लिहिला जातो. ना की पळपुट्या, सत्तापिपासू,धोकेबाज, गद्दारी करणाऱ्यांचा..!

लेखक : संतोष लहामगे, संगमनेर.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*