शिर्डीवर वर्चस्वासाठी विखेंसमोर कॉंग्रेसचे आव्हान..!

अहमदनगर :

कॉंग्रेस पक्षाकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळूनही ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलगा डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी मिळविण्यासाठी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षबदल केला होता. त्यामुळे त्यांना भाजपने मंत्रिपद देऊन आणखी ताकद दिली आहे. मात्र, आता विखे कुटुंबीयांनी नगर जिल्ह्यातील १२ विधानसभा जागा भाजपला मिळवून देण्याची घोषणा करून कॉंग्रेस व राष्ट्रवादीला चेतविले आहे. परिणामी या दोन्ही पक्षांनी एकासएक प्रबळ उमेदवारी देऊन विखेंसमोर आव्हान उभे करण्याची तयारी केली आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात मंत्री व खासदार या दोन्ही विखे पिता-पुत्रांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे संस्थापक व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर थेट टीका करण्यास सुरुवात करून भाजपमध्येही ठोस स्थान निर्माण करण्याची तयारी केली आहे. अशावेळी विखे यांचा हा चौखूर उधळलेला वारू रोखण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी एक झाली आहे. एक सक्षम उमेदवार देऊन विखेंना आव्हान निर्माण करण्यासह निवडणूक जिंकण्याची तयारी करीत कॉंग्रेसने येथे सर्वेक्षण करून मोर्चेबांधणी केली आहे.

सध्या तरी विखे यांच्या विरोधात उमेदवार कोण असेच चित्र आहे. मात्र, यापूर्वी विखेंना विजयापासून रोखण्यामध्ये थोड्याफार मताने अपयशी ठरलेल्या डॉ. राजेंद्र पिपाडा यांना सर्वोतोपरी ताकद देऊन लढविण्याची तयारी कॉंग्रेसची असल्याचे दिसते. डॉ. पिपाडा यांनी राहता नगरपालिका निवडणुकीत विखे गटाला पराभूत करण्याची किमया दाखवून आपली ताकद सिद्ध केलेली आहे. मात्र, ते कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी करण्याची कितपत शक्यता आहे, याबद्दल साशंकता आहे. अशावेळी मग थोरात यांची मुलगी शरयू रणजितसिंग देशमुख यांना किंवा युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

२००९ मध्ये विखे यांना निसटता विजय मिळाला होता. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी ६६,९९२ मतदान मिळवत विखे गटाच्या तोंडचे पाणी पळविले होते. त्यावेळी राधाकृष्ण विखे यांना ८०,३०१ मतदान मिळाले होते. त्या निसटत्या विजयामुळे मागील निवडणुकीत आणखी जास्त ताकद लावून विखे यांनी १,२१,४५९ मतदान मिळवत ७४,६६२ इतक्या फरकाने विजय मिळविला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सुमारे ७० हजार मतदान विखे यांच्या विरोधात झाले होते. तोच धागा पकडून यंदा स्थानिक विखे विरोधक शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांची गोळाबेरीज करून किमान १,१०,००० मतदान एकत्र करून विखेंना आव्हान देण्याची तयारी प्रदेश कॉंग्रेस नेतृत्वाने केली आहे. त्याला विखे व भाजप कसे प्रतिआव्हान देतात, याकडे राज्याचे लक्ष आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*