विश्वशांतीसाठी माध्यमांची भूमिका महत्वाची : जयप्रकाश नारायण

पुणे :

जगातील प्रत्येक देश हा अनेक समस्या आणि  दहशतीतून मार्गक्रम करत आहे. प्रत्येकांना शांती,  सुख आणि समाधान हवे आहे. मात्र प्रत्येकांनी केवळ माध्यमांवर विसंबून न राहता दोघांनी एकत्र यावे. माध्यमांनी जगातील प्रत्येक नागरिकांना शांतीची शाश्वती आणि विश्वास द्यावा. केवळ नफा न पाहता विश्वशांतीसाठी माध्यमांनी आपली महत्वपूर्ण भूमिका आदा करावी, असे प्रतिपादन हैद्राबाद येथील लोकसत्ता पार्टीचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या राष्ट्रीय माध्यम आणि पत्रकारिता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी नवी दिल्ली येथील द वायरचे संस्थापक अध्यक्ष एम.के. वेणू,  कोलकोत्ता प्रेस क्लबचे अध्यक्ष स्नेहास सूर, वरिष्ठ पत्रकार  आर.एन.भास्कर, दिल्ली येथील वरिष्ठ पत्रकार निरिजा चौधरी, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, प्र- कुलगुरू आर. एम. चिटणिस, प्र-कुलगुरू प्रा. डी. पी आपटे, माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता डॉ. शरदचंद्र दराडे पाटील,  माईर्स एमआयटीचे विश्वस्त डॉ. चंद्रकांत पांडव, अधिष्ठाता डॉ. अनुराधा पाराशर, डॉ. ठाकूर आदी उपस्थित होते.

डॉ. जयप्रकाश नारायण म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती ही भारतासाठी भूषणावह बाब आहे. माध्यम हे नैतिक विचारांची आदान-प्रदान करणारी संस्था आहेत. भारतीय माध्यम अनेक चांगले-वाईट अनुभव घेत आहे. माध्यमे समाजाला मुक्ततेचा संदेश देतात. माध्यम देशाच्या विकासासाठी नेहमी तत्पर असतात. मानवी विकासातील समस्यांच्या अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी माध्यम नेहमी पुढे असतात. माध्यमांनी केवळ नफा कमविण्यासाठी कामे करू नयेत. समाजाचे देणे म्हणून विरोधकांची भूमिका निभवावी. तत्वज्ञ हे देशाच्या विचारांची गुरूकिल्ली असतात. राजकीय पक्ष आणि धर्म, जातीच्या पलीकडे जाऊन पत्रकारिता करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.  

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, बदलत्या काळानुसार पत्रकारितेच्या भूमिकेत आणि वागण्यातही मोठा बदल होत आहे. आजच्या घडीला पत्रकारांची भूमिका बदलल्यामुळे माध्यम नैतिकता विसरत चालले आहेत. जाहिरातीचे काम बातमीदारांना करावे लागत असल्यामुळे केवळ नफा याच एकमेव भूमिकेतून बातमीदारी केली जात असल्याची खंत ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.  

प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड म्हणाले, माध्यमाच्या विचाराने देश चालत असतो. जगाला सुख, शांती, समाधानाचा मार्ग स्वामी विवेकानंद यांच्यानंतर माध्यमांनी दाखविला आहे. ज्ञान आणि विज्ञानाचे संगम उन्नतीसाठी झाला. पत्रकार समाजाला आणि देशाला दिशा देण्याचे काम करत असतो.  शांततापूर्ण आणि तणावमुक्त समाज निर्मितीसाठी माध्यमांची भूमिका महत्वाची असते. जगाला एक परिवार बनविण्यासाठी भारत आपले कार्य करत आहे. या घुमटामध्ये मानवतेच्या इतिहासातील जगाला दिशा दाखविण्याचे काम केलेल्यांची पुतळे उभी केली आहेत. वैश्विक भारतीय संस्कृतीचे दर्शन या घुमटाच्या माध्यमातून होत आहे.

राहुल कराड म्हणाले, लोकशाहीच्या वाढीसाठी आणि लोकशाही सुरक्षित बनविण्यासाठी महत्वाचा खांब म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते. माध्यमांचा महत्वाचा रोल देशाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी असतो. एमआयटी संस्था नेहमी शांती आणि विकासासाठी कार्यरत आहे. शांतीसाठी जगातील सर्वात मोठ्या घुमटाची उभारणी करण्यात आली आहे.  तत्वज्ञ, विचारवंत, धर्मगुरू आणि देवता यांचा एकत्र मेळ याठिकाणी घालण्यात आला आहे. या परिषदेला देशात मोठी परिषद बनविण्याचे काम सुरू झाले आहे. पत्रकार संघाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांना एकत्र बांधण्याचा धागा आज बांधण्यात आला आहे.
पत्रकारिता ही सतत शिक्षणाचे काम करीत असते. हा लोकशाहीचा चौथा खांब आहे.  

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*