Blog | भारतीय तरुणाचा अभूतपूर्व शोध, बनवले हवेत तरंगणारे वाहन

भारतीय तरुणाचा अभूतपूर्व शोध,
मोदींकडून प्रेरणा घेऊन बनवले हवेत तरंगणारे वाहन

मुंबई: (सरकारी प्रतिनिधी) रस्त्यावरच्या जीवघेण्या खड्ड्याना कंटाळल्याने, पेट्रोलचा खर्च होमलोनच्या हफ्त्याच्या वर जाऊ लागल्याने, ओलाउबरची नाटके सहन न झाल्याने, ट्राफिकमध्ये कोंडमारा होऊ लागल्याने हैराण झालेल्या देशभक्त तरुणाने सरकारवर टीका न करता स्वतः आपला उपाय शोधून काढला आहे. त्याने चक्क हवेत तरंगणारे वाहन बनवले आहे. त्यात दोन माणसे बसू शकतात. हे वाहन बॅटरीवर चालत नाही. कारण वीज कधी जाईल ह्याची खात्री नसते, त्यामुळे बॅटरी पूर्ण चार्ज होतच नाही. म्हणून ह्या तरंगत्या वाहनात अणुउर्जेचे खास तंत्रज्ञान वापरले आहे. त्यासाठी सॅटेलाईटच्या माध्यमातून थेट ‘नाणार अणुऊर्जा केंद्रा’तून ऊर्जा घेऊन वाहनाच्या इंजिनात जोडण्यात त्याला यश आले आहे. यामध्ये विक्रम लॅण्डर व इसरोची मोठी मदत झाल्याचे कळते.

गेली पाच वर्षे परिस्थिती सुधारायची वाट पाहून शेवटी सत्तर वर्षात बिघडलेली देशाची परिस्थिती सुधारायला मोदी सरकारला आणखी सातशे वर्षे लागणार आहेत हा साक्षात्कार झाल्याने ह्या देशभक्त तरुणाने स्वतः ह्या समस्येवर उपाय शोधून अवघ्या सहा महिन्यात ह्या वाहनाची बांधणी केली. ट्राफिकच्या दंडाच्या रकमेत नुकतीच धमाकेदार वाढ झाल्याने ट्राफिक हवलदारांना चुकवण्यासाठी व त्यातून बहुमूल्य असे ‘स्वकीय चलन’ वाचवण्यात ह्या वाहनाचा चांगलाच उपयोग होऊ शकतो अशी ह्या देशभक्त तरुणास पूर्ण खात्री आहे. मुळात वाहतुकीचे नियम पाळण्याची गरजच भासणार नाही ह्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतांना तुम्हाला सोबतच्या फोटोत दिसेल.

ह्या अद्भुत वाहनाच्या फायनल ट्रायल्स झाल्या असून रोजच्या प्रवासासाठी ते पूर्ण तयार असल्याचे देशभक्त तरुणाने सांगितले आहे. परंतु आता वाहन तयार जरी झाले असले तरी रोज जायचे कुठे हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे. कारण कालच त्याला नोकरीवरून काढण्यात आले आहे. कंपनीने देशभर पसरलेल्या मंदीमुळे बिझनेस ठप्प झाल्याचे कारण दिले. परंतु देशभक्त तरुणास खात्री आहे कि कंपनी काहीतरी काळे धंदे करत असावी आणि मोदींनी बांबू लावल्याने चालवणे कठीण झाले असावे. आपली नोकरी जाण्याचा ह्या देशभक्त तरुणास अतीव आनंद झालेला दिसून येत आहे. घरात दोन डायबेटीसचे पेशन्ट आणि एक हार्टचा पेशन्ट असूनही त्याला त्यांच्या औषधाच्या खर्चाची चिंता नाही असे कळले. कारण जेनेरिक औषधे आणल्याने त्याचा ९५ टक्के खर्च कमी झाला आहे. अर्थात ब्रँडेड औषधांसारखे परिणाम मिळत नाहीत अशी घरातील म्हातारी तक्रार करत होती. पण ‘इतकी वर्षे काँग्रेसचे सरकार होते तेव्हा कुठे गेला होता’ असा प्रश्न विचारल्यापासून ती गप्प बसली आहेत.

आता ह्या तरंगत्या वाहनाचे काय करणार असे विचारल्यावर देशभक्त तरुण म्हणाला कि पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारला वापरायला देणार आहे. सरकारकडे पुरेशा बोटी नसल्याने आपले जगावेगळे संशोधन भारतमातेच्या कामी येणार असल्याने त्याला फार थोर वाटत आहे. परंतु महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांची बस रस्त्यातल्या खड्ड्यात अडकत असल्याने आपल्या ह्या तरंगत्या वाहनातुन खुद्द मुख्यमंत्री महाराष्ट्रभर फिरणार आहेत ह्या बातमीने त्याला अतीव आनंद होऊन त्याचा ऊर भरून आला आहे. आपले कष्ट ‘देशाच्या सेवे’साठी कामी येत आहेत ह्याचा त्याला अभिमान वाटत आहे. ह्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया घ्यायला आमचा तिसरा प्रतिनिधी रवाना झाला आहे असे कळले. आधी गेलेल्या एका प्रतिनिधीला सत्ताधाऱ्यांना प्रश्न कसा विचारायचा हे माहित नव्हते, दुसरा प्रतिनिधी अचानक भोंग्यातून किंचाळल्याचा आवाज आल्याने घाबरून गेला आहे व त्याला कानात ‘कुर्र्र कुर्र्र’ करणे सुरु आहे असे आत्तापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार खात्रीलायक सूत्रांकडून कळले आहे.

नोकरी गेल्यावर पोटापाण्यासाठी काय करणार असे विचारल्यावर देशभक्त तरुण म्हणाला कि मागच्या पाच वर्षात सरकारने दिलेल्या गाजरांचा भरपूर स्टॉक करून ठेवला आहे. त्यावर आयुष्याची पुढची सत्तर वर्षे आरामात काढता येतील. त्याला तरी पोटापाण्याची चिंता नाही कारण आता ३७० कलम काश्मिरातून काढून टाकले आहे आणि पाकिस्तानवर हल्ला करून पाकड्याना त्यांची जागा दाखवून देण्यात येणार आहे. संपूर्ण देशात एनआरसी लागू झाल्यावर तर त्याला रोज उपाशी पोटी समाधानाची ढेकर येणार आहे असे त्याने हसऱ्या चेहऱ्याने सांगितले.

अतिशय आनंदी उत्साही आणि सकारात्मक विचार असलेल्या ह्या देशभक्त तरुणाला त्याच्या यशाचे रहस्य विचारल्यावर त्याने सांगितले कि मी दर रविवारी सकाळी ‘मन कि बात’ रिपीट ब्रॉडकास्टसह ऐकतो. ह्या तरुणाचे नाव त्याच्या विनंतीवरून गुप्त ठेवण्यात आले आहे.

निर्मला सीतारामन ह्या प्रकरणावर आपले मत व्यक्त करतांना म्हणाल्या, “ये मिलेनियल्स.. अब कऊनसा इंडस्ट्री डुबाइगा आय रिअली डॉन्ट नो.. आई ह्याव नो आयडिया “

(दैनिक जोकमट्टा)

*संदीप डांगे यांच्या फेसबुक खात्यावरून साभार

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*