पारदर्शक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज : निवडणूक आयोग

मुंबई :

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरीत्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज येथे दिली. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर श्री. सिंह यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत राज्यातील तयारीसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे उपस्थित होते.        

श्री. बलदेव सिंह म्हणाले, राज्यात एकाच टप्प्यात 21 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. 4 ऑक्टोबर ही उमेदवारी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 5 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. 7 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 24 ऑक्टोंबर 19 रोजी मतमोजणी होईल.

इव्हिएम-व्हीव्हीपॅट जनजागृती

विधानसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (इव्हिएम)चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात 1.80 लाख बॅलेट युनिट, 1.30 लाख कंट्रोल युनिट आणि 1.35 लाख व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाईल. या सर्व यंत्रणांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.

मतदान टक्केवारी

विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत राज्यात 50.67 टक्के तर 2014 च्या निवडणुकीत 60.32 टक्के मतदान झाले होते. यावेळी यापेक्षा जास्त मतदान होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्मचारी सज्ज

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कामकाजात कोणतीही चूक होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत असून या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचेही श्री. सिंह यांनी सांगितले.

मतदार जनजागृती

निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी प्रत्येक मतदारसंघात विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदान करण्यासाठी आवाहन, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनची (इव्हीएम) सुरक्षितता आदींबद्दल मतदारांना माहिती देण्यात येत आहे. इव्हिएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर पूर्ण राज्यात प्रथम होणार असल्यामुळे मतदारांमध्ये यासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मशिनवर यासंबंधीची माहिती देण्यात येत आहे. आतापर्यंत 9 लाख नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला असून त्यापैकी 6.30 लाख मतदारांनी या यंत्रावर प्रत्यक्ष मतदानाची तालीम घेतली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*