चला मतदान करुया; माधुरीसह सदिच्छादुतांचे आवाहन

मुंबई : 

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत मतदार जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सुप्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यामार्फत ‘चला मतदान करुया’ ही मोहिम चित्रफितीच्या रुपाने राबविण्यास सुरुवात झाली आहे.

या चित्रफितीद्वारे श्रीमती. दीक्षित या लोकशाही प्रक्रिया आणि देशाच्या विकासात जागरुक मतदारांच्या भूमिकेचे महत्व समजावून सांगताहेत. मतदार जागृतीच्या मोहिमेला कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध  मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून साथ मिळाली आहे.

या सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण सन्मानित अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ.निशिगंधा वाड, राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही याच 12 सदिच्छादूतांनी मतदारांना मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजाविण्याचे आवाहन केले होते. समाजमाध्यमे, मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरात फलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*