लंके यांच्यासमोर आव्हान एकोपा निर्माण करण्याचे

अहमदनगर :
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा कालावधी जसा जवळ येत आहे, तशी उमेदवारी मिळविण्यासह निवडून येण्यासाठीची गोळाबेरीज करण्यासाठी इच्छुक सरसावले आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघामध्येही अशीच स्थिती आहे. येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या निलेश लंके यांना यासाठीचे मोठे आव्हान असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.

विधासभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांना येथून शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा मोठा फायदा होत असल्याने त्यांना निवडणूक सोपी असल्याचे मानले जात होते. पारनेर व नगर तालुक्यातील शिवसैनिक त्यांना ताकद देऊन निवडून आणीत होते. मात्र, यंदा या मतदारसंघात सेनेची ताकद विभागली आहे. येथून इच्छुक असलेले जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांना उमेदवारी न मिळाल्यास नगर तालुका शिवसेना काय भूमिका घेणार, यावर येथील विजयाचे गणित ठरणार आहे.

तर, राष्ट्रवादीमध्ये असलेल्या अंतर्गत विरोधाला लंके कसे शह देतात, यावर येथील आघाडीचा विजय निश्चित होणार आहे. लंके यांनी युवा नेते म्हणून पारनेर-नगरमध्ये जोरदार हवा निर्माण केली आहे. तरुणांची त्यांना साथ आहे. मात्र, येथील राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षामधील अंतर्गत विरोध आणि सेनेची ताकद यांच्या आव्हानांमधून लंके कशी वाट काढणार, याबद्दल सध्या मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत. अंतर्गत एकोपा निर्माण न झाल्यास लंके यांना शिवसैनिक कशी साथ देतात, यावर विजयाचे गणित बदलणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*