पाचपुते यांच्यावर होईना ‘साईकृपा’; उमेदवारीबद्दलही उलटसुलट चर्चा

अहमदनगर :
नगर जिल्ह्यामधील विकासाचा दृष्टिकोन असलेला नेता म्हणून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची ओळख आहे. सर्वसामान्यांशी असलेली घट्ट नाळ त्यांना वेगवेगळ्या पक्षाकडून व वेगवेगळ्या चिन्हावर निवडून येण्यासाठी उपयोगी ठरली. मात्र, मागील निवडणुकीत त्यांच्यावर ‘साईकृपा’ झाली नाही. यंदाही त्यांच्या उमेदवारीसह त्यांना कोण मदत करणार याचीच चर्चा मतदारसंघामध्ये दिसते.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये मागील निवडणुकीत ऐनवेळी पाचपुते यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविली होती. त्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत त्यांचा आमदार राहुल जगताप यांनी पराभव केला. त्यावेळी शिवसेनेकडून शशिकांत गाडे यांचाही पराभव झाला. मात्र, भाजप व सेनेची एकूण गोळाबेरीज लक्षात घेता यंदा येथून भाजपचा विजय सुकर मनाला जात होता. अशावेळी आमदार जगताप यांनी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत भाजपमध्ये येऊन उमेदवारी करण्याची तयारी केल्याने उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, जगताप यांना भाजपने दार उघडले नाही.

त्यामुळे पाचपुते यांनाच उमेदवारी मिळणार असे चित्र निर्माण झाले. मात्र, आता पाचपुते यांच्या संबंधित देवदैठण येथील साईकृपा खासगी कारखान्यावर ‘आरआरसी’ कारवाईचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. याबाबतचा आदेश नगरच्या साखर सहसंचालक कार्यालयाला सोमवारी मिळाला आहे. साईकृपा (एक) या कारखान्याकडे ‘एफआरपी’ची ३ कोटी १ लाख ५६ हजार रुपयांची रक्कम थकित आहे. या कारवाईनुसार महसूल प्रशासन शिल्लक साखर व बगॅसची विक्रीतून वसुली करून ऊस उत्पादकांना देणार आहे. या कारवाईमुळे पाचपुते यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत उलटसुलट चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. त्यातच शिर्डीचे माजी आमदार व मंत्री विखे यांच्याकडून कितपत मदत होणार, याबद्दलही चर्चा आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*