तरच भगतसिंहांच्या विचाराचे राज्य येईल : कॉ. क्षीरसागर

अहमदनगर :

सत्ताधारी सातत्याने शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणसाच्या विरोधी भुमिका घेऊन भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. त्यामुळे मंदीसारख्या मोठ्या समस्या निर्माण होऊन सामान्य माणुस संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कामगारांची बेरोजगारी व सर्वसामान्य माणसांची महागाईशी लढाई या समस्यांना कारणीभुत असणार्‍या प्रतिनिधींना आज घरी बसविण्याची गरज आहे. आपल्या मतांवर निवडून येऊन आपले कोणतेच प्रश्‍न सोडवित नाहीत तर ते अदानी-अंबानींच्या दावणीला बांधले गेले आहे. कंपन्यांना फायदे कसे होतील यातच ते मश्गुल आहेत. म्हणून शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविणारा आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठविल्यास भगतसिंहांच्या विचाराचे राज्य येणार असल्याची भावना शेतकरी नेते कॉ.राजन क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

शहिद भगतसिंह जयंतीनिमित्त कामगार संघटना महासंघ, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व भैरवनाथ वाकळे मित्र मंडळाच्या वतीने नगर-मनमाड रोड, सावेडी नाका येथील देवांग कोष्टी मंगल कार्यालयात कामगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी कॉ. क्षीरसागर बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉ.महादेव पालवे तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ.बाबा आरगडे, भाकप महिला फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ.स्मिता पानसरे, विडी कामगार नेते कॉ.शंकर न्यालपेल्ली, कॉ.भैरवनाथ वाकळे, कॉ.महेबुब सय्यद, प्रकाश पोटे, सुलाबाई आदमाने, अशोक सब्बन आदींसह कामगार चळवळीतील पदाधिकारी व विविध कामगार संघटनेचे सदस्य व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

पुढे कॉ. क्षीरसागर म्हणाले की, नवीन साम्राज्यवादाच्या जोखडात पुन्हा भारत बांधले जात असताना भगतसिंहाचा लढा विचार करायला लावणारा आहे. माणसाकडून माणसाचे होणार्‍या शोषणाला मूठमाती देण्याची त्यांची वैचारिक बांधिलकी जपण्याचे काम आजच्या युवकांना करावे लागणार आहे. भगतसिंहांनी धर्म व राष्ट्रप्रेमाची केलेली व्याख्या आजच्या युवकांपुढे पुन्हा नव्याने मांडण्याची गरज आहे. हिंदू राष्ट्र करण्यासाठी निघालेले सत्ताधारी देशाच्या संविधानावर आघात करीत आहे. भगतसिंहांचे क्रांतीकारी पुरोगामी विचार हेच समाजाला दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात रामदास वाघस्कर यांनी कामगारांना टिकण्यासाठी व जुलमी राजवटीचा बिमोड करण्यासाठी एकजुटीने संघर्ष करण्याची गरज असून, त्यासाठी शहिद भगतसिंहाचा विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले. इन्कलाब जिंदाबाद…, भगतसिंग अमर रहे! च्या घोषणांनी सभागृह दणाणून निघाला.

कॉ.शंकर न्यालपेल्ली म्हणाले की, सत्ताधार्‍यांच्या कामगार विरोधी धोरणामुळे देशातील सर्व कामगार देशोधडीला लागले आहेत. नोटाबंदीने अर्थव्यवस्था डबघाईस आली. तर जीएसटीने छोटे उद्योग, व्यवसाय बंद पडून आर्थिक मंदीचे सावट भारतात आहे. विडीवर 28 टक्के जीएसटी आकारुन हा उद्योग बंद पाडण्याचे पाप सत्ताधारी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कॉ.सुभाष लांडे यांनी नागरिकांमध्ये सत्ताधार्‍यां विरोधात असंतोष खदखद आहे. वादळापुर्वीची ही शांतता असून, कामगार पिळवणुकीचा उद्रेक होणार आहे. जुल्मी सत्ता उलथविण्याचे धाडस फक्त कामगार वर्गात असून, या विरोधात एकजुट होण्याचे सांगितले. सिटू कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.कॉ. महेबुब सय्यद यांनी भगतसिंहांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून,कामगार वर्गाला आपल्या हक्क अधिकारासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. अशोक सब्बन यांनी शेतकरी, कामगार मतदारांना त्यांची मताची खरी किंमत समजली तर आपला प्रतिनिधी विधासभेत निवडून येऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात कामगार नेते कॉ.महादेव पालवे यांनी कामगार एकजूटीने प्रश्‍न सुटणार असल्याचे सांगितले. यासाठी कामगार चळवळ व्यापक व दृढ करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. मेळावा यशस्वी करण्यासाठी कामगार संघटना महासंघाचे लहूजी लोणकर, तुषार सोनवणे, दिपक शिरसाठ, कुशीनाथ कुळधरण, अमोल चेमटे, वैभव कदम, विजय केदारे, दत्ताभाऊ वडवणीकर, रावसाहेब कर्पे, सतीश निमसे, अमोल पळसकर, दत्ता जाधव, अकाश साठे, चंद्रकांत माळी, किशोर खाडे, योगेश महाजन आदी कामगार बंधुंनी परिश्रम घेतले. आभार भैरवनाथ वाकळे यांनी मानले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*