विधानसभा निवडणुकीतही विक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न

अहमदनगर :

विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती सुरु केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांकडून मतदानाचा हक्क बजावणारच, असे संकल्पपत्र भरुन घेतले जाणार आहे. जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात विविध शाळांतील विद्यार्थ्यांना ही संकल्पपत्रे दिली जात असून ती शाळेमार्फतच संकलित केली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी ही संकल्पपत्रे भरुन देऊन विक्रमाला गवसणी घातली होती. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली या विधानसभा निवडणुकीतही संकल्पपत्राद्वारे मतदान जागृतीचा विक्रम होईल, असा प्रशासनाला विश्वास आहे.

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्या सूचनांची प्रत्यक्ष कार्यवाही जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. स्वीप समितीच्या माध्यमातून मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम, रॅली, प्रभातफेरी काढल्या जात आहेत. त्याचबरोबर शिक्षण विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्रे भरुन घेण्यास सुरुवात झाली आहे. बाराही विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. थोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.

मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, लोकशाहीचा उत्सव असणार्‍या या निवडणुकात सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून सहभाग द्यावा, यासाठी या संकल्पपत्रांच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*