बारामतीत पुन्हा धनगर विरुद्ध मराठा लढत; भाजपची मोर्चेबांधणी..?

पुणे :
धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर २०१४ मध्ये निवडणूक जाहीरनाम्यात उल्लेख करून भाजपने निवडणूक लढविली होती. मात्र, नियमाच्या कचाट्यात हा मुद्दा निकाली काढणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला शक्य झाले नाही. त्यामुळेच यंदा पुन्हा एकदा बारामतीतून जातीचे राजकीय गणित पक्के करण्याच्या उद्देशाने भाजपने धनगर समाजाचे युवा व झंझावाती नेतृत्व गोपीचंद पडळकर यांना बारामतीतून उमेदवारी देत मोर्चेबांधणी केली आहे.

मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून पवार कुटुंबियांवर वेळोवेळी टीका झालेली आहे. पवार कुटुंबानेही त्या टीकेला उत्तर दिलेले नाही. तोच धागा पकडून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने उमेदवारी दिली होती. धनगर समाजाचे नेतृत्व म्हणून जानकर यांना ओबीसी समाजाने भरभरून मतदान दिले होते. मात्र, तरीही खासदार सुळे यांचा विजय झाला होता. मात्र, त्याचा मोठा फायदा भाजपला महाराष्ट्रात झाला होता. धनगर समाजाने भाजपला साथ देत सत्तेवर येण्याची संधी दिली होती.

यंदा तसाच दुसरा डाव खेळण्याची तयारी ठेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी लढवय्या नेते पडळकर यांना बारामती विधानसभेला उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात पडळकर उमेदवारी करीत आहेत. येथील ही लढत राज्यभर चर्चेचा विषय बनेल. पडळकर डार्क हॉर्स ठरून येथून भाजपला विजय मिळवून देतील असा कार्यकर्त्यांना विश्वास वाटत आहे. मात्र, येथून पवार यांना त्यांच्या रणमैदानात हरविणे अशक्य असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. एकूणच यंदा राज्यभरातील सर्वाधिक हॉट निवडणूक बारामतीच्या जागेवर होणार असलयाचे दिसते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*