Blog | ट्रम्प चीनला संपवूनच शांत बसणार आहेत असं वाटतंय..!

चीन आणि अमेरिका यांच्यामधील व्यापार युद्ध सध्या जगाच्या अर्थव्यवस्थेला डोकेदुखी बनले आहे. ट्रम्प यांनी चीनची आर्थिक कोंडी करून नेमके काय साधले असू शकते, याचा वेध घेण्याचा प्रयत्न श्रीकांत आव्हाड (पुणे) यांनी केला आहे. त्यांनी यावर लिहिलेला लेख वाचकांसाठी शेअर करीत आहोत…

सध्याच्या घडीला अमेरिका आणि रशिया हे शत्रूराष्ट्र आहेत यावर माझा विश्वास नाही. जगात दोन मुख्य राजकीय विभाग आहेत. एक कम्युनिस्ट + हुकूमशाही आणि दुसरा लोकशाही. मागील कित्येक दशकांपासून हुकूमशाही + कम्युनिस्टांचं प्रतिनिधित्व रशिया करत आहे आणि लोकशाहीच प्रतिनिधित्व अमेरिकेकडे आहे. अगदी पंधरा वीस वर्षांपूर्वीपर्यंत एखादा हुकूमशाही देश, किंवा कम्युनिस्ट देश म्हटलं की तो रशियाच्या अंकित आहे, असंच समजलं जायचं, आणि रशियासुद्धा त्या देशाला मदत करताना दिसत असे. परंतु, मागील काही वर्षांपासून कम्युनिस्ट आणि हुकूमशहांचा आश्रयदाता चीन झाला आहे. चीनने रशियाला आंतरराष्ट्रीय राजकारणातून अलगद बाजूला करून त्याची जागा हडप केली आहे. चीन सध्या जगभरात प्रत्येक ठिकाणी आडकाठी घालण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेला आर्थिक आणि राजकीय टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. महासत्ता होण्याकडे त्याची वाटचाल सुरु आहे… आणि याचा परिणाम रशियाच्या प्रतिमेवर होत आहे.

साहजिकच रशियाला आपलं स्थान मिळविण्यासाठी चीनला संपवणं आवश्यक आहे. चीनला संपवणं म्हणजे चीनची आर्थिक ताकद कमी करणं. ते काम ट्रम्प भाऊंनी सुरु केलंय. ट्रम्प हे कसलेले उद्योजक आहेत. अमेरिकेतील त्यांचा श्रीमंतीचे धडे देणारा कार्यक्रम खूप जणांसाठी फायद्याचा ठरलेला आहे. शून्यातून, अगदी दिवाळखोरीतून उभा राहिलेला हा माणूस आहे. या माणसाला आर्थिक व्यवहार चांगले कळतात. साहजिकच कुणाच्या आर्थिक नाड्या कशा आवळ्याच्या हेही त्यांना चांगलंच कळत असणार.

चीन हा जगातील एक गूढ शक्ती म्हणून वावरत आहे. प्रत्येक जण चीनशी व्यवहार करताना सांभाळून पावलं टाकण्याचा प्रयत्न करतोय. अशावेळी थोड्या शांत सौम्य असलेल्या हिलरी क्लिंटन जर राष्ट्रपती झाल्या असत्या तर, त्यांनीसुद्धा चीनच्या विरोधात न जाता त्याला सांभाळून घेण्याचाच प्रयत्न केला असता. याविरोधी वृत्ती ट्रम्प यांची आहे. अतिशय आक्रमक आणि भीडभाड न ठेवता कडवट किंवा अगदी विक्षिप्तपणाचे वाटतील असे निर्णय घेण्याची तयारी असणारे हे गृहस्थ आहेत. रशियाने जर ट्रम्प यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले असतील तर ते ट्रम्प यांची ही वृत्ती पाहूनच केले असतील…

ट्रम्प यांनी सत्तेत आल्याआल्या चीनला लक्ष्य करायला सुरुवात केली. कदाचित रशिया आणि ट्रम्प यांची तशी डील असेल. चीनवर व्यापारी निर्बंध लादायला सुरुवात केली. चीनने सुरुवातीला नेहमीप्रमाणे त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. आतून कारस्थाने सुरु ठेवली. कदाचित ट्रम्प काही काळाने शांत होतील असेही वाटले असेल. पण ट्रम्प यांनी आपले धोरण आणखी आक्रमक केले. फक्त चीनला लक्ष्य करत आहे असे वाटायला नको म्हणून जगातील आणखीही काही मोठ्या देशांशी आर्थिक बाबतीत वितुष्ट निर्माण होईल अश्या कृती केल्या.

वर्षभरानंतर पाहता सध्या चीनची अवस्था बिकट झाली आहे. चीनमधील टॉप १० कंपन्या मोडकळीस आलेल्या आहेत. मागील वर्षी, अमेरिकेचे आर्थिक निर्बंध असेच चालू राहिले तर आमच्या देशातील किमान २० मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघू शकतील असे चीनमधील एका अधिकाऱ्याने मान्य केल्याची बातमी आली होती. ते होताना दिसत आहे. चीनचे मार्केट मंदावले आहे. निर्यात कमी झाली आहे. अंतर्गत मार्केटसुद्धा अपेक्षेप्रमाणे वाढत नाहीये. आता चीनमधील मोठया कंपन्या हळूहळू चीनबाहेर जात आहेत. बऱ्याच कंपन्या व्हिएतनाम, थायलंडमध्ये गेल्या आहेत. आता भारताने कंपनी करकपात केल्यानंतर तर कित्येक कंपन्या इकडे विस्थापित होण्याच्या विचारात आहेत. एकट्या ट्रम्प यांनी चीनची अवस्था बिकट केली आहे. त्यात आपण कंपनी करकपात करून हातोडा मारला आहे. आणखी इतर देशांना अजून सुरुवात करायची आहे. चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या देशांना अजून बंड पुकारायचे आहे. अजून खूप काही होणे बाकी आहे…

चीनची सुरु झालेली आर्थिक कोंडी आणखी काळ चालू राहील. कदाचित चीनने आंतरराष्ट्रीय राजकारणात अतिदखल न देण्याचे मान्य केल्यानंतर काहीशी तडजोड होईल. पण तोपर्यंत चीनला आर्थिक दृष्ट्या चांगला फटका बसलेला असेल. चीनची आर्थिक ताकद खूप मोठी असली तरी एवढा वाढवून ठेवलेला पसारा सांभाळायलासुद्धा भरपूर पैसा लागतो. त्यामुळे जास्त काळ तग धरणे चीनला आता शक्य नाही…. कदाचित या सगळ्यावर उपाय म्हणून चीनकडून एखादे युद्ध भडकवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठ्या देशांना ठिकाण्यावर आणण्यासाठी लहान देशांना युद्धात ओढणे ही चीनची कायमची स्ट्रॅटेजि आहे. ती पुन्हा एकदा अमलात आणली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही….

पण काहीही झालं तरी ट्रम्प यांनी चीनच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत, आणि भारताने कंपनी करकपात करून त्यावर कडी केली आहे हे मान्य करावेच लागेल. आणि रशिया नेहमीप्रमाणे शांतपणे सगळी गंमत बघतोय आणि आपली वेळ येण्याची वाट पाहतोय…

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*