मंत्रालयात सिंगल यूज प्लास्टिकला ‘गुडबाय’

मुंबई :

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने  ‘ स्वच्छता एक सेवा’ हा उपक्रम राज्यभर राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत मंत्रालयात प्लास्टिक वस्तूंचा  त्याग करून पर्यावरणाच्या रक्षणात योगदान देण्याची  शपथ आज राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी घेतली तसेच मंत्रालयातील वरिष्ठ  अधिकारी कर्मचाऱ्यांनाही  शपथ दिली.

‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहिम ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत राबविला जात आहे. मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात नगरविकास विभागाने आयोजित केलेल्या ‘गुडबाय’ सिंगल यूज प्लास्टिक या उपक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.

यावेळी मुख्य सचिव श्री. मेहता म्हणाले की, आजपासून मी सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करणार नाही. मी सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंचा त्याग करुन विश्व पर्यावरण रक्षणात माझेही योगदान देईन. माझी हीच कृती बापुजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिलेली आदरांजली असेल, असेही श्री.महेता यांनी सांगितले.

यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक,  पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव दिनेश वाघमारे, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, अल्पसंख्यांक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, सचिव श्रीमती विनीता वेद-सिंघल इ. मंत्रालयीन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

सिंगल युज प्लास्टिकला गुडबाय करण्याच्या या मोहिमेमुळे नागरिकांत जागृती होईल. ‘आता आपल्यामुळेच फरक पडेल’, या घोषवाक्याचे आवाहन नगरविकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*