BLOG | राजकारण म्हणजे भावनेशी खेळाला जाणारा भावनाशून्य खेळ..!

नुकतीच एका राष्ट्रीय पक्षाच्या विधानसभा निवडणुकी संदर्भात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या प्रक्रियेमध्ये एक मुक साक्षीदार म्हणून हजर राहण्याची संधी मिळाली. सहा जिल्ह्यांचा दौरा करून, दोन जिल्ह्यातील दिडशेपेक्षा जास्त उमेदवारांच्या मुलाखती घेताना मूक साक्षीदार म्हणून हजर राहण्याची संधी होती ही. सामाजिक व राजकीयदृष्ट्या आणखी नॉलेज देणारी. भारतीय समाजाचे खऱ्या अर्थाने आकलन करून देणारी.

विज्ञान विषयाचा विद्यार्थी म्हणून या घटनेकडे एक प्रयोग म्हणून पाहत असताना काही गोष्टी प्रकर्षाने ध्यानात आल्या. वरवर खुप सोपे अन सहज वाटणारे हे प्रकरण अद्भुत आहे, अचंबित करणारे, आश्चर्यकारक, विस्मयकारक आहे. तसेच सामान्य माणसाच्या आकलनशक्तीच्या आणि कल्पनाशक्तीच्या पलीकडले आहे. नवख्या तरुण उमेदवारापासून ते एक-दोन-तीन आणि सहा टर्म विधानसभेमध्ये घालवलेल्या मातब्बर नेत्यांपर्यंत सर्वांचे म्हणणे ऐकण्याची संधी मिळाली. 25 वर्षाच्या तरुणांपासून साठ वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या भावना व्यक्त केल्या. दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत पहिले येणारे विद्यार्थी हे वेगळे असतात. त्यांचे
स्पर्धक वेगळे असतात. त्यांच्या सिल्याबसमध्ये बदल जाणवतो. परंतु काही मतदारसंघांमध्ये तेच विद्यार्थी, तीच परीक्षा, तेच प्रश्न आणि दुर्दैवाने निकालही तोच..! असं दहा, वीस, तीस वर्षापर्यंत सहन करणारे आणि अपेक्षित निकाल यावा यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे, लढा देणारे राजकीय कार्यकर्ते पाहिले. मग नोकरी / व्यवसायामध्ये असणारी स्पर्धा किती किरकोळ आहे याची जाणीव होते.

राजकारण हे तसे अभ्यासाच्या दृष्टीने दुर्लक्षित क्षेत्र आहे. महिलांची संख्या त्यात खूप कमी आहे. सुशिक्षित उमेदवारांची संख्याही कमी आहे. त्या मानाने गेल्या काही वर्षांमध्ये महिला आणि सुशिक्षित तरुणांची या क्षेत्राकडे येण्याची ओढ वाढलेली दिसते. शाळेमध्ये कधीही न गेलेले, परंतु जीवनाच्या शाळेमध्ये अगदी डॉक्टरेट आणि पोस्ट डॉक्टर मिळवलेले अनेक उमेदवार याठिकाणी अक्षरशः डोळ्यांमध्ये पाणी आणि कंठामध्ये प्राण आणून जेव्हा आपली कहाणी सांगतात, तेव्हा आपल्याही डोळ्याच्या कडा नकळत पाणावतात..!

परंतु, राजकारण हे निष्ठुर क्षेत्र आहे. निवडणुका जरी भावनिक मुद्द्यावर लढवल्या जात असल्या, तरी या निवडणुकीचा खेळ खेळणारे, नियम ठरवणारे, या खेळाला नियंत्रित करणारे हे अत्यंत भावनाशून्य पद्धतीने निर्णय घेतात, यात शंका नाही. त्यालाही ‘कठोर निर्णयाचे’ गोंडस नाव देऊन अशाप्रकारे हा खेळ खेळला जातो. तब्बल दोन लाख लोकांमधून उमेदवार निवडला जात असताना एक सोडुन दोन लाख लोकांना आपण कसं मॅनेज / प्रभावित करू याबाबतचे प्रत्येकाचे तर्क-वितर्क, कल्पनाशक्ती, प्लॅनिंग, त्याचं सादरीकरण, प्रत्यक्ष केलेल्या कामाचा आढावा याचे सादरीकरण, न केलेले काम देखील मीच केली आहेत असं दाखवण्याचा अट्टहास, या सर्व बाबी पहायला मिळतात. शांत राहून वर्षानुवर्षे संघटनेवर आणि देशावर प्रेम करणारे लोक पाहिले, की सत्तेसाठी क्षणात पक्ष बदलून तात्काळ लाभ मिळवण्यासाठी उतावीळ झालेल्या लोकांची कीव करावीशी वाटते. काही वेळेस अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या लोकांना यश मिळते देखील.

आपली रेषा मोठी करून, दुसर्‍याची रेषा कशी छोटी आहे किंवा कशी खोडता येईल हे सिद्ध करण्यासाठी धडपडणारे लोकही आहेत. तर त्याच वेळी मी माझं काम शांतपणे करतो आहे आणि संघटनेने, नेतृत्वाने जो निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य राहील असे प्रामाणिकपणे सांगणारी लोक देखील आहेत. त्यामध्ये अगदीच नवखे होते, शिकलेले होते आणि काहीजण निवडणुकांमध्ये पडलेले होते. ज्याने आयुष्यात एकही निवडणूक लढवली नाही परंतु उतार वयामध्ये एखादी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणारे होते आणि पिढीजात लोकप्रतिनिधी पदावर हक्क सांगणारे लोकही होते. मला दिली नाही तर माझ्या बायकोला द्या, बायकोला नाही दिले तर मुलाला द्या, मुलाला नाही दिली तर सुनेला द्या, असंही सांगणारे होते. मला नाही दिली तरी चालेल, पण त्याला देऊ नका असे सांगणारे होते आणि आम्हाला कोणालाही दिली नाही तरी चालेल परंतु समोरच्याला देऊ नका असं सांगणारे देखिल होते.

राजकारणातुन मिळणारी सत्ता ही या देशातील सर्वोच्च शक्ती आहे. संपुर्ण प्रशासन तुमच्या हाताशी असते. त्यातुन सर्वासामान्यांसाठी अनेक अद्भुत गोष्टी केल्या जावु शकतात. या ठिकाणी सर्वसामान्य माणुस केंद्रस्थानी मानणारा, बदलत्या जगाशी जुळवुन घेणारा, राहकीय फायद्यासाठी पायाजवळ न बघता पुढील २०-२५-५० वर्षांचा सारासार विचार करणाराच माणुस निवडुन दिला पाहिजे. सर्वसामान्य माणुस जेंव्हा राजकारण्याकडे मदतीला येतो, तेंव्हा त्याचे बहुतेक इतर पर्याय संपलेले असतात. त्यामुळे त्याला राजकीय नेतृत्वाच्या दारावर न्यायाची किंवा किमान पक्षी ऐकुन घेतले जाण्याची अपेक्षा असते. त्या सर्वांना न्याय देण्याची भुमिका घेणारा नेताच या सर्वोच्च जागेवर असावा.

सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने मला भारतामध्ये व परदेशात दोन्हीकडे शिक्षण व कामानिमित्ताने तेथील व्यवस्था बघण्याची संधी मिळाली. दुर्दैवाने म्हणालो ते अशासाठी की, जर आपल्याला चांगली गोष्ट कशी असते हेच माहित नसेल तर ती न मिळाल्यास आपल्याला वाईट वाटत नाही. परंतु, परदेशांमधील अतिशय चांगल्या सार्वजनिक व्यवस्था पाहिल्यानंतर, भारतातील सार्वजनिक व्यवस्थांची “अवस्था” पाहिली की खूपच वाईट वाटते. शिक्षणासाठी परदेशामध्ये असताना तेथील निवडणूक पाहिली होती. परंतु, तेथे आपल्यासारखा “माहोल” बनत नाही. लोकसंख्या कमी असल्याने मोठ्या सभा, पदयात्रा, लाऊड स्पीकर यांचा वापर नसतो. एखाद्या मोठ्या सभागृहात तीनशे माणसे जमली तरीही खूप मोठा कार्यक्रम झाला असे मानतात. परंतु, राजकीय सत्ता राबवताना तेथील लोक नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य देतात. व्हीआयपी कल्चर नाही. राजकीय क्षेत्रात काम करणारी व्यक्ती, अगदी खासदार-आमदार (तिथे त्याला नवे वेगवेगळी आहेत, इटाकेच) हे देखील, सर्वसामान्यांप्रमाणे दैनंदिन जीवनात आपले व्यवहार करत असतात. शाळा, मॉल, एटीएम, सार्वजनिक ठिकाणी फिरन्याची जागा, येथे तुम्हाला आमदार खासदारही त्यांच्या कुटुंबीयांसमवेत दिसू शकतात. भविष्यात असेच चित्र भारतामध्ये असावे. करदात्यांच्या सर्व पैशाचा विनियोग त्यांनाच सुविधा देण्यासाठी व्हावा. त्या पैशातून केवळ मूठभर राजकारण्यांनी मजा मारु नये, अशी एक माफक अपेक्षा यानिमित्ताने ठेवतो.

ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार मानतो आणि विधानसभा निवडणुकीसाठी ज्या इच्छुकांनी मुलाखती दिल्या, त्या सर्व उमेदवारांना उमेदवारी मिळण्यासाठी आणि पुढे निवडून येण्यासाठी हार्दिक शुभेच्छा..! लोकशाहीच्या या उत्सवामध्ये भाग घेण्यासाठी सर्व नागरिकांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना व प्रशासनाला शुभेच्छा..!

लेखक : डॉ. भारत गंगाधर करडक-पाटील
(पी.एचडी.- स्पेन, पोस्ट डॉक्टरेट – ऑस्ट्रेलिया)
करडकवाडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर.
मो. 9903636999

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*