महिलांच्या सन्मानार्थ भाकप रिंगणात : कॉ. भारती

अहमदनगर

भारतीय कम्युनिस्ट पक्ष नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्या प्रचारार्थ जोरदार शक्तीप्रदर्शन करीत शहरातून प्रचारफेरी काढण्यात आली. जुने बसस्थानक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या प्रचार रॅलीस प्रारंभ झाले. हातात लाल झेंडे घेऊन कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. ढोल व संबळच्या निनादात निघालेल्या प्रचारफेरीने सर्वांचे लक्ष वेधले.

मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण प्रचारफेरी पुढे मार्गस्थ झाली. यामध्ये कॉ.सुभाष लांडे, कॉ.शंकर न्यालपेल्ली, बन्सी सातपुते, बाबा आरगडे, अ‍ॅड.सुधीर टोकेकर, आसिफ दुलेखान, कॉ.महेबुब सय्यद, दिपक नेटके, विकास गेरंगे, अरुण थिटे, सतीश निमसे, विजय केदारे, रमेश नागवडे, अंबादास दौंड, महादेव पालवे, कॉ.रामदास वाघस्कर, उज्वला वाकळे, भारती न्यालपेल्ली, संगीता कोंडा, सगुना श्रीमल, वैशाली तोडमल, वर्षा थोरवे, शोभा वाघ, मंदाकिनी वाकळे, अनिता कर्पे, वंदना कर्पे, सुभद्रा कणखर, शकिला शेख, दिलशाद शेख, जयश्री आगळे, ताई कोतकर, कल्पना बडे आदींसह भाकपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रचारफेरीचे शहरातील माळीवाडा, माणिक चौक, कापड बाजार, चितळे रोड या प्रमुख रस्त्यावरुन मार्गक्रमण झाले.  उमेदवार वाकळे यांनी ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधत ज्येष्ठ व्यक्तींचे आशिर्वाद घेतले. तर सकारात्मक विकासासाठी कटिबध्द असताना शहराच्या विकासासाठी संधी देण्याचे मतदारांना भावनिक आवाहन केले. प्राचर रॅलीची सांगता दिल्लीगेट येथे होऊन चौकसभा घेण्यात आली. कॉ.सुभाष लांडे म्हणाले की,  शहराची अधोगतीकडे वाटचाल चालू असून, नवीन पर्याय दिल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही. ऐतिहासिक वारसा असलेल्या शहराला बदनाम करुन गालबोट लावण्याचे काम मागील लोकप्रतिनिधींनी केले. नगरकरांना भाकपने योग्य उमेदवार देऊन चांगला पर्याय दिला असल्याचे त्यांनी सांगितले. कॉ.महेबुब सय्यद यांनी जाती व धर्माच्या नावाखाली मत मागण्याचे काम येथील लोकप्रतिनिधी करतात. निवडून आल्यानंतर सर्वसामान्यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करुन आपले हित साधण्यात येथील मंडळी पटाईत आहेत. यांच्या भितीपायी नवीन उद्योगधंदे शहरात येण्यास देखील घाबरतात. युवकांच्या हाताला काम नसल्याने त्यांचे पंटर म्हणून टोळके फिरताना दिसत आहे. चांगले लोकप्रतिधी निवडून देऊन ही परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शंकर न्यालपेल्ली यांनी भिकारीप्रमाणे 10 रुपयाचे जेवण नको असून, स्वाभिमानाने जगणारी आंम्ही माणसे आहोत. आरोग्य, निवारा, रोजगार व शिक्षण मुलभूत सुविधांच्या प्रश्‍नांना बगल देऊन 10 रुपयाच्या जेवणाच्या तुकड्याची बतावणी केली जात असल्याचे सांगून नांव न घेता उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा भारती न्यालपेल्ली म्हणाल्या की, महिला भगिनींच्या सन्मान व शहराच्या विकासासाठी भाकपचे उमेदवार वाकळे निवडणुक लढवित आहे. महिलांच्या प्रश्‍नाकडे यामागील सर्वच लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. भाकपचे उमेदवार सतत महिला भगिनींच्या सन्मान व संरक्षणासाठी कटिबध्द असून, काही वर्षापुर्वी प्रेमदान चौकात महिला पोलीसावर काही गुंडांनी हल्ला केला होता. तीच्या संरक्षणासाठी बहिरनाथ वाकळे व त्यांचे सहकारी धावून गेल्याचे त्यांनी उदाहरण दिले.
बहिरनाथ वाकळे यांनी शहरात बदल घडविण्यासाठी सर्वसामान्यांच्या जिवावर निवडणुकीला उभे राहिलो असून, त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम करण्यात येणार आहे. शहरात भूखंड माफिया व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन सर्वसामान्यांचे लचके तोडत आहे. भूखंड माफियाच्या हितासाठी दिल्लीगेटचे गाळे पाडण्यात आले. तेथे पोट भरणार्‍या अनेक गाळेधारकांचे संसार उघड्यावर आले. चळवळीतून पुढे आलो असून, नगरकरांच्या विश्‍वासाला तड जाऊ न देता विकासात्मक बदल घडविणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली. तर प्रचारफेरीला इतर पक्षाप्रमाणे पैसे देऊन गर्दी जमा न करता स्वयंफुर्तीने कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले असल्याचा टोला त्यांनी लगावला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*