ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपुर्वी अदा करा : शिक्षक परिषद

अहमदनगर :

ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीच्या घोळामुळे राज्यातील अनेक शिक्षक, कर्मचारी नियमित वेतनापासून वंचित असून, हा प्रश्‍न तातडीने सोडवून ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळी सणापुर्वी अदा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा व शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना दिले आहे.

राज्यातील सर्व शिक्षक कर्मचार्‍यांना प्रत्येक महिन्याचे वेतन 1 तारखेला अदा करण्यात यावे असा आदेश शासनाने प्रशासनाला दिला आहे. परंतु राज्यातील सर्व शिक्षक कर्मचार्‍यांना 1 तारखेलाच वेतन अदा करण्याची कृती प्रशासनाकडून झालेली नाही. वेतनाच्या विलंबाला जबाबदार असणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांविरुद्ध कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची कारवाई सुद्धा करण्यात आलेली नसल्याचे खेद शिक्षक परिषदेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यातील सर्व शिक्षक कर्मचार्‍यांना ऑनलाइन पद्धतीने वेतन देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोष निर्माण झाल्यामुळे राज्यातील शेकडो शिक्षक कर्मचारी गेल्या दोन ते तीन महिन्याच्या वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे शासनाने 1 तारखेलाच वेतन देण्याचे आदेश प्रत्यक्षात कार्यान्वित झाले नाही. त्याच्यात ऑनलाईन व ऑफलाईन प्रक्रियेचा प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने शिक्षक कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. दसरा-दिवाळी सारख्या महत्त्वाचे सण विनावेतन साजरा करण्याचे दुर्भाग्य प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे व दिरंगाईमुळे शिक्षक कर्मचार्‍यांवर आले असल्याची शोकांतिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे. या प्रश्‍नासंदर्भात तात्काळ आढावा घेऊन, वेतनापासून वंचित असलेल्या राज्यातील सर्व शिक्षक कर्मचार्‍यांना नियमित वेतन तात्काळ अदा करावे, तसेच ऑक्टोंबरचे वेतन दिवाळीपूर्वी सर्व शिक्षक कर्मचार्‍यांना अदा करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली असल्याचे बोडखे यांनी सांगितले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*