लक्षवेधी लढती | कोरेगावात ‘शिंदेशाही’साठी लढा; राष्ट्रवादीचा विजयाचा दावा

सातारा :

जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोरेगावची ओळख ओळख आहे. मात्र, हीच ओळख पुसून टाकण्यासह या भागावर भगवा झेंडा फडकविण्याचा विडा उचलीत शिवसेना-भाजप महायुतीने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे येथील चुरस वाढली आहे.

माजी मंत्री, आमदार व राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनाच पक्षाने पुन्हा एकदा येथून उमेदवारी दिली आहे. तर, भाजपमधून सेनेत येऊन महेश शिंदे यांनी उमेदवारी मिळवली आहे. येथून युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांना माघार घ्यावी लागली आहे. ते कोणाला कशी मदत करतात यावर येथील मताधिक्याचे गणित ठरणार आहे.

कोरेगावसह सातारा शहर व परिसरावर शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व आहे. त्याच जीवावर येथील लोकसभेसह सर्व विधानसभा जागा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या ताब्यात ठेवणे आघाडीला शक्य झाले होते. याच राष्ट्रवादीच्या बुरुजाला सुरुंग लावण्यासाठीचे धोरण ठेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महेश शिंदे यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आमदार शशिकांत शिंदे यांनी अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा विजयी आघाडी घेण्यासाठी प्रचारामध्येही आघाडी घेतल्याची चर्चा आहे.

म्हणून राष्ट्रवादीचा विजयाचा पक्का दावा..!

२०१४ मध्ये या जागेवर शशीकांत शिंदे यांचा एकहाती विजय झाला होता. शशिकांत शिंदे यांनी ९५ हजार २१३ इतके मतदान घेत ४७ हजार २४७ मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे विजय कानसे यांना ४७ हजार ९६६ मतदान मिळाले होते. तर, तिसऱ्या स्थानावर असलेल्या शिवसेनेचे हणमंत चावरे यांना फ़क़्त १५ हजार ८६२ मतदान मिळाले होते. एकूणच या भागातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीची ताकद लक्षात घेता ही निवडणूक सोपी असल्याचा दावा शशिकांत शिंदे समर्थकांचा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*