स्मार्ट सिटी प्रकल्पावर भाजपची गुपचिळी..!

पुणे :

मोठ्या घोषणा करून राज्यासह देशभरात विस्तारलेल्या भाजप या राष्ट्रीय पक्षाने यंदाची विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्यावरून थेट पाकिस्तान, काश्मीर व मंदिराच्या मुद्यावर नेऊन ठेवली आहे. त्यांना शहरी व ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळत आहे. मात्र, विकासाच्या मुद्यावर बोलण्याचे टाळणाऱ्या भाजपने त्यांच्या महत्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत जाहीर प्रचारातून चकार शब्दही काढलेला नाही.

निवडणूक कोणत्या दिशेला आणि कशा पद्धतीने न्यायाची यावर मजबूत पकड निर्माण करण्यात भाजप यशस्वी होत आहे. विकासाच्या मुद्यावर निवडणुका न लढविता भावनिक व धार्मिक मुद्यांवर सहजपणे जिंकण्याचा नवा फंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष गृहमंत्री अमित शाह यांच्या टीमने विकसित केला आहे. त्यामुळेच यंदाची महारष्ट्र विधानसभा निवडणूक शेती, दुष्काळ, पाणी, सार्वजनिक आरोग्य, रस्ते विकास, रोजगार आणि एकूणच विकासाचे मुद्दे मागे पडून आता राष्ट्रीय सुरक्षा हा मुद्दा भाजपने प्रचारात यशस्वीपणे रेटला आहे. अशावेळी सर्व माध्यमेही त्याच बाजूने बातम्या पेरण्यात मग्न आहेत.

शहरी मतदारांवर भाजपची खरी भिस्त असते. त्यांना आकर्षित करून भाजपने महापालिका ताब्यात घेतल्या. त्यावेळी स्मार्ट सिटी नावाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भाजपचे नेते मांडत होते. मात्र, आताच्या विधानसभा निवडणुकीत याच प्रकल्पावर मोदी-शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही बोलताना दिसत नाहीत. त्याचे कोडे अजूनही कायम आहे. प्रचाराचा कालावधी संपत आला तरीही भाजपच्या एकानेही या प्रकल्पावर चाकर शब्द न काढता अळीमिळी गुपचिळी धोरण ठेवले आहे. त्याचे गौडबंगाल काय याचे कोडे फ़क़्त काहीजण सोशल मिडीयावर व्यक्त करीत आहेत. बाकी सब अच्छा चल रहा है…!

ही शहरे होणार होती स्मार्ट

बृहन्मुंबई, ठाणे , कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक, अमरावती, सोलापूर, नागपूर, पुणे, औरंगाबाद या सर्व शहरांना स्मार्ट करण्यासाठीचे नियोजन केंद्र सरकारने २०१५ मध्ये जाहीर केले होते. त्यानंतर विविध निवडणुकीत हाच मुद्दा पुढे करीत महाराष्ट्र भाजपने भरभरून मतदान मिळवले होते. मात्र, आता याच प्रमुख मुद्यावर भाजपचे कोणीही बोलत नसल्याने नेटकरांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, बोलणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. तसेच विरोधी पक्षही त्यावर बोलत नसल्याने हा महत्त्वपूर्ण मुदा पूर्णपणे मागे पडला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*