मुघलांप्रमाणे सत्तेसाठी घराणेशाही : कन्हैया कुमार

अहमदनगर :

राजकारणात देखील मुघलांप्रमाणे सत्तेसाठी घराणेशाही चालू आहे. नेत्याचा मुलगा नेता बनण्याच्या तयारीत आहे. मतदारांनी देखील जागृक होऊन आपला व आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार केला पाहिजे. लोकशाहीत सर्वसामान्यांचे प्रश्‍न महत्त्वाचे असतात. त्यांच्या प्रश्‍नांनाच बगल देण्यात आल्याने योग्य पर्याय उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोण-कोणत्या पक्षात किती वेळ राहणार? याचा भरवसा राहिला नाही. जागृक नागरिकांनी सर्वसामान्य व आपल्या प्रश्‍नांची जाणीव असलेल्या उमेदवारास निवडून द्यावे. यासाठी भाकपने बहिरनाथ वाकळे यांच्या माध्यमातून सक्षम पर्याय नगरकरांना दिला आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सक्षम पर्याय निर्माण करुन त्यांना प्रतिनिधित्व देण्याचे आवाहन जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीचे (जेएनयू) विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष तथा भाकपचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य कन्हैया कुमार यांनी केले.

शहर विधानसभा मतदार संघतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या लोकशाही आघाडीचे  उमेदवार भैरवनाथ तुकाराम वाकळे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि.17 ऑक्टोबर) लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सभा घेण्यात आली. यावेळी कन्हैया कुमार बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द शाहिर संभाजी भगत, उमेदवार बहिरनाथ वाकळे, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.सुभाष लांडे, कॉ.महेबुब सय्यद, विडी कामगार नेते शंकर न्यालपेल्ली, अ‍ॅड.सुधीर टोकेकर, बन्सी सातपुते, कॉ.बाबा आरगडे, राजूभाई शेख, आझाद ठुबे, डॉ.राधेश्याम गुंजाळ, शांताराम वाळूंज, टिळक भोस, मिलिंद रानडे आदींसह भाकपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांसह युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे कन्हैया कुमार म्हणाले की, सत्ताधार्‍यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना बगल दिली असून, 420 प्रश्‍नांना फक्त कलम 370 हटविल्याचे उत्तर दिले जाते. महाराष्ट्र हा समतावादी विचारांचा असून, अनेक देशव्यापी चळवळीचा उगम या राज्यातून झाला आहे. भाजप प्रत्येक मालाचे दुकान बनले आहे. भ्रष्टाचाराचा आरोप करुन नेत्यांना ईडीच्या नोटीस पाठविण्यात येतात. तर तेच नेते भाजपचेचे सदस्यत्व घेऊन बाहेर पडताना दिसत आहे. कलम 370 हटविल्याने सर्वसामान्यांच्या जीवनात काही बदल झालेला नाही. निवडणुकीतून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना बगल देऊन पुन्हा मंदिर मस्जिदचा प्रश्‍न समोर आनला जात आहे. आपले सरकार येत असल्याचा डंका वाजविण्यात येत असून मागील 5 वर्षात काय कामे केले? याचा हिशोब मात्र देण्यात आलेला नाही. भाजपाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे चित्र रंगविण्याचे षडयंत्र चालू आहे. जाहिरातीद्वारे मतदारांना ठगण्याचे काम सत्ताधारी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर नगरपालिकेपासून तर लोकसभेपर्यंन्त मोदींच्या नावाने मते मागण्याचा धंदा चालू असल्याचे सांगून, सत्ताधार्‍यांचा त्यांनी समाचार घेतला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*