कोकाटेंचा विजय मोठ्या मताधिक्याने : मोहिते पाटील

सोलापूर :

माढा मतदारसंघामधील माळशिरस तालुक्याच्या १४ गावांमधून किमान १८ हजारांचे मताधिक्य मोहिते पाटील गट देईल. तसेच पंढरपूर तालुक्याच्या ४२ गावातूनही सुधाकरपंत परिचारक व कल्याणराव काळे यांचे गट मोठे मताधिक्य देतील. तसेच होमपिचवर माढा तालुक्यातून महायुतीला निश्चितच लीड मिळणार असल्याने शिवसेना उमेदवार संजय कोकाटे यांना आता विजयापासून कोणीही रोखू शकत नाही असे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले.

महायुतीचे उमेदवार संजय कोकाटे यांच्या प्रचारार्थ बेंबळे येथे आयोजित प्रचारसभेत मोहिते पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे, शिवसेना युवक नेते पृथ्वीराज सावंत, लेबर फेडरेशनचे माजी चेअरमन भारत पाटील, कृषीमुल्य आयोगाचे सदस्य प्रा. सुहास पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, आरपीआयचे नागनाथ ओहळ, पोपट अनपट, कान्हापुरीच्या सरपंच स्मिता पाटील, मिटकलवाडीचे सरपंच दत्ताभाऊ मिटकल, जानता राजा संघटनेचे सुधीर महाडीक, किशोर सलगर मनीश सुर्वे आदी उपस्थित होते.

रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की, जनतेने परिवर्तनाचा निर्णय घेऊन निवडणूक हाती घेतली आहे. लोकसभेला भाजप उमेदवाराला १ लाखाचे मताधिक्य देण्याचा शब्द आम्ही खरा करून दाखवला होता. आताही मोहिते पाटील गट मताधिक्य देणार आहे. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प पूर्ण करण्याचा शब्द दिला आहे. त्यासाठी या भागातून आपला आमदार विधानसभेत पाठवायचा आहे.

माजी समाजकल्याण सभापती कांबळे म्हणाले की, येथे प्रथमच दुरंगी लढत होण्याचे चित्र निर्माण झाले तेव्हा मला आम्ही एक कोटी देतो, निवडणूक लढावा असाही निरोप पाठविला. विकासाचे गाजर दाखवून आमदार बबन शिंदे यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. या भागातील मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोकाटे यांनाच विजयी करा.

उमेदवार संजय कोकाटे यावेळी म्हणाले की, पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या आमदारांनी विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळेच यंदा मतदारसंघातील सामान्य जनतेने परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार आहे. सत्तेबरोबर राहून या भागातील विकासाच्या कामास गती देण्यासाठी गट तट बाजूला सारून सहकार्य करा. मी शब्दाला जागून विकासासाठी काम करीत राहील.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*