Blog | पवार म्हणजे फक्त पॉवर..!

हा माणूस काहींना मनापासून आवडतो, तर काहीजण या माणसाची यथेच्छ हेटाळणी करतात, तसेच काहीजणांना हा माणूस काहीतरी वेगळे रसायन वाटते…

होय, हा माणूस असाच आहे. आता काहींना आवडत असेल, तर नंतर त्याचे सगळेच आवडेल असेही नाही…

पण हा माणूस अविचल आहे आणि लढवय्याही. घडविलेले चेले सोडून गेले, इतर पक्षातून सत्तेच्या लोभाने आलेलेही आता पळाले. तरीही हा माणूस जिगर सोडून घरी बसला नाही…

बसणारही नाही. हिंदुत्ववादी मंडळींनी हा माणूस फक्त पाण्यात पाहण्यात जिंदगी वाया घालविली. मदत करूनही त्याच संघातील काहींनी या माणसाला हेटाळणीचा विषय बनविण्यासाठी प्रपोगंडा राबविला. तरीही या माणसात कटुता रुजली नाही…

पवार म्हणजे भ्रष्ट, असा कावा करीत माझ्यासारख्या लाखोंची डोकी भडकावली. मात्र, तरीही पवार आपल्या स्टाईलने राजकारणात, समाजकारणात आणि जनतेच्या कल्याणात आत्ममग्न राहिले. त्यातल्याच माझ्यासारख्या काहींना आता साहेब म्हणजे या आणीबाणीत आधार वाटतात…

अनेकांना मदतीचा हात दिला तर, काहींना थेट मोठ्या संधी देऊन देशाच्या विकासाला हातभार लावण्याची संधी दिली. अशावेळी डावा आहे की कट्टर उजवा याकडे दुर्लक्ष करून त्यांनी फक्त त्याची गुणवत्ता पहिली…

कारण देव-धर्मातील तारणहार नाही, तर समाजाला दिशा देणारा नेता घडविणे गरजेचे असल्याचे पवारांना पटले होते. कर्तव्यनिष्ठ असा हा लढवय्या किती वयाचा झालाय याला महत्व नाही. त्याचे काम महत्त्वाचे आहे…

देशावर व त्यातल्या विचारी नागरिकांवर वैचारिक संकट आले, वैयक्तिक संकट आले, नैसर्गिक संकट आले तरी मी लढत आहे आणि लढणार हाच पवारांचा विचार…

लोकशाही मूल्य व संविधान यावर निष्ठा असलेला नेता. कोणी कितीही चिखलफेक करोत. त्यांच्याकडून अजाणतेपणी झालेल्या चुका उगळीत बसून त्यावर राजकीय पोळी भाजून घेवोत. पवार साहेबांची कॉपी करून राजकारणात जम बसविण्याचा अट्टाहास करोत. नाहीतर क्रिकेटमध्ये डोकं घालोत…

पवार, हे पॉवर आहेत आणि पॉवरबाज राहतील. सत्ता हातात असो नाहीतर विरोधात असोत, त्यांच्या कामाला त्याने काहीही फरक पडत नाही. विकासकामे विनासायास हातावेगळी करणारा हा पॉवरबाज नेता…

आज पावसात भिजून भाषण करतात याचे कौतुक नाही. ते तर कोणीही करील. त्यांचा जिगरबाजपणा याने फक्त जास्त अधोरेखित झाला इतकेच. देशापुढील इतक्या वाईट काळात पवार निकाराने एकहाती किल्ला लढवीत आहेत. तरुणाईला नवी उमेद देत आहेत. लढण्याची शिकवण देत आहेत…

हे जास्त महत्वाचे आहे. संकटांना घाबरू नका, तर त्वेषाने भिडा. विजय-पराजयची तमा न बाळगता विचारांशी बांधिलकी जपून, काळानुसार भाषेत बदल करून लढा, लढत राहा…

हा पवार साहेब आपल्याला संदेश देत आहेत. त्यांचे काम हाच विचार आहे. आचरण हाच मार्गदर्शक पदपथ आहे. नव्हे विजयरथ आहे…

लेखक : सचिन मोहन चोभे (मो. 9422462003)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*