BLOG | मोबाईल आणि तत्वज्ञान..!

ॐ पूर्णमदः पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥

अर्थ: तुमच्या फोन मध्ये सोळा जीबी स्टोरेज असते. ते रिकामे असले तरी सोळा जीबीच असते, व्हिडीओ, फोटो, मेसेज, आणि कशाकशाने फुल्ल भरलेले असले तरी सोळा जीबीच असते. त्यात जे काही तयार होते ते त्या सोळा जीबीपासून तयार होते तरी त्या सोळा जीबीतच राहते, त्यातून जे काही डिलीट होते ते त्या सोळा जीबीतुन डिलीट होऊनसुद्धा शिल्लक सोळा जीबीच राहते.

सोळा जीबीची गाणी डाऊनलोड करा, व्हिडीओ शूट करा, फोटो शूट करा, इतरांना शेअर करा, मित्राच्या फोनमधून ट्रान्सफर करा. तुमच्या सोळा जीबीमध्ये एक बाईटचाही फरक पडत नाही. पण ही जी काही प्रक्रिया होते त्याला कारणीभूत एक विद्युत प्रवाह असतो. फोनस्टोरेज किंवा जगातल्या कोणत्याही स्टोरेज सर्व्हर यामध्ये जे काही निर्माण होते डिलीट होते ते त्या विद्युतप्रवाहाची कमाल असते. तो विद्युतप्रवाह जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे वापरू शकतो तो त्या स्टोरेजचा हवा तसा वापर करू शकतो. तुम्ही मी जी काही लिहितो, क्लिक करतो, कमेंट करतो, रीऍक्ट करतो हे सर्व त्या विद्युतप्रवाहाचा वापर करून करतो. जगातल्या सर्व सर्व्हर स्टोरेजमध्ये प्रत्येक क्षणाला आणि त्याच्या हजाराव्या भागात लाखो निर्मिती आणि क्षयाच्या घटना घडत असतात.

हेच सगळे खऱ्याखुऱ्या विश्वात घडते असे ईशावास्योपनिषदात असलेल्या ह्या वरील श्लोकातून सांगितले गेले आहे…

तर आता ही जी काही निर्मिती आणि क्षय होण्याची जी प्रक्रिया आहे आणि त्याची जी काही कारणे आहेत म्हणजे तो कोणता विद्युत प्रवाह आहे त्याचा शोध घेणे, त्यावर नियंत्रण मिळवणे, (म्हणजे मुक्त होणे- मोख्ख मोक्ष, निर्वाण) हा जो काही प्रवास आहे त्याचे नाव म्हणजे अध्यात्म.

अन ह्या अध्यात्माचा जगातल्या कोणत्याही धर्म, पंथ, बाबा, बुवा, संत, महंत, साधू, संन्याशी, फकीर, फादर, सेंट, मौलाना, फलाने ढिमके ह्यांच्याशी कसलाच संबंध नाही. आपण जो श्वास घेतो तो जितका आपला स्वतःच्या हक्काचा, खाजगी आणि खराखुरा आहे तितके अध्यात्म आपले स्वतःचे आणि खरेखुरे, खाजगी असते.

लेखक : संदीप डांगे, नाशिक

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*