माण-खटावमध्ये पाण्याभोवती फिरतेय राजकारण..!

सातारा :

आमचं ठरलंय अशी घोषणा देत माजी आमदार जयकुमार गोरे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्यात यंदा विरोधकांना यश आले त्यामुळेच येथे यंदा थेट तिरंगी लढत होत आहे. भाजपचे जय्कुराम गोरे, यांच्यासह महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे शेखर गोरे आणि अपक्ष उमेदवार माजी प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यामध्ये ही लढत होत आहे. गोरे बंधू यांना हटविण्याच्या या लढाईचा केंद्रबिंदू बनले आहे पाण्याचा मुद्दा..!

मागील १५ दिवस चाललेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या थोपा थंडावल्या आहेत. शनिवारी जयकुमार गोरे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वडुजमध्ये पदयाञा काढली. तर, शेखर गोरे यांनी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या दहिवडीतील सभेद्वारे अखेरची साद घातली. ‘आमचं ठरलंय’मधून सर्वसहमतीचे अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी म्हसवड येथे पदयाञा काढून बाजारपटांगणावर सांगता सभा घेतली. गोरे बंधू व महायुतीमधील मतदानाच्या फुटीचा फायदा घेण्यात ‘आमचं ठरलंय’ टीम कितपत यश मिळवते त्यावर येथील निकाल ठरणार असल्याचे मतदार सांगतात.

पाणी, रोजगार, शिक्षण यांच्याभोवती माणदेशातील यंदाचे राजकारण फिरत आहे. जयकुमार गोरे यांनी प्रचारासाठी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांची सभा घेतली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी येथल कल आणि भविष्यातील राजकीय गरज लक्षात घेऊन विरोधी उमेदवार प्रभाकर देशमुख व मिञपक्षाचे उमेदवार शेखर गोरे यांच्यावरही टिका केली नाही. ‘आमचं ठरलंय’मधून उशीरा उमेदवारी मिळूनही प्रभाकर देशमुख यांनी गावोगावी जाऊन मतदारांना साद घातली. त्यांच्यासह प्रभाकर घार्गे, डाॕ. दिलीप येळगावकर, रणजीत देशमुख, आनिल देसाई, डाॕ.संदिप पोळ, मामुशेठ विरकर, संदिप मांडवे, अनुराधा देशमुख, हर्षदा देशमुख यांनी आपापल्या भागात देशमुख यांचा निकराने प्रचार केला आहे. शेवटच्या टप्यात प्रभाकर देशमुख यांच्या ‘आमचं ठरलंय’मध्ये माण-खटावची काँग्रेस, मनसे, स्वाभीमानी शेतकरी संघटना, रासप, आरपीआय गट सहभागी झाल्याने यंदा मतदारांचे काय ठरले हेच स्पष्ट होणे फ़क़्त बाकी राहिले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*