Blog | उत्सव नाही, हे कर्तव्य आहे..!

निवडणूक आयोगाने आणि मीडियाने मतदान या संकल्पनेचा अक्षरशः पचका करून टाकलाय… लोकशाहीचा सोहळा, लोकशाहीचा उत्सव, पवित्र कार्य असली पांचट विशेषणे वापरून मतदानाचं गांभीर्यच संपवून टाकलं आहे. कुणी निवडणुकीचे गाणे गातंय, कुणी मस्तपैकी फटाकडे फोडतायेत, दोन चार सेलिब्रिटींना बोटावर शाई लावून सेल्फी पोस्ट करायला सांगतायत… उत्सव, सण हे मजा करण्यासाठी असतात, आता लोकांना मतदानाचा दिवस सुद्धा मजा मरण्यासाठीच आहे असं वाटायला लागलंय. मतदान हा काय सोहळा नाही किंवा उत्सव नाही. ते एक कर्तव्य आहे, देशाप्रती निभावयाचे महत्वाचे कर्तव्य, ज्याद्वारे आपण आपला प्रतिनिधी निवडून देणार असतो. हा लोकशाहीच्या प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा आहे. यात कोणत्या पक्षाचं सरकार येतंय याला महत्व नसतं, तर जे सरकार येतंय ते लोकशाहीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सत्तेत येतं हे महत्वाचं असतं. या प्रक्रियेचं आपल्याला भाग व्हायचं असतं. याद्वारे आपण लोकशाहीच्या स्थपनेला बळकट करत असतो. सत्तेत कुणीही आलं तरी ते लोकशाहीच्या इतर नियमांना आपोआपच बांधले जातात. त्यासाठी जबाबदार राहतात… इथं निवडणुकीलाच मौजमजेचा स्वरूप दिल्यामुळे, जनतेला आणि लोकप्रतिनिधींना, एकूण लोकशाही प्रक्रियाच टाईमपास वाटायला लागली आहे. फक्त निवडणूक, किंवा मतदान म्हणजे लोकशाही नसते, तर ती एकूण लोकशाहीचा एक महत्वाचा भाग असते. ती प्रक्रिया गांभीर्याने पार पडली तर लोकशाहीच्या इतर प्रक्रियांना गांभीर्याने घेतले जाईल. नाहीतर सगळा खेळखंडोबा ठरलेला आहेच. लेखक : श्रीकांत आव्हाड, सामाजिक-राजकीय अभ्यासक, पुणे
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*