Blog | नाटक नकोय, इतकाच लै कंड असेल तर..!

पराभूत उमेदवारांच्या कुटुंबियांच्या भेटीला जाऊन दुःखावरील खपल्या काढायला जाण्याची काहीच गरज नाही… इतकाच लै त्यांच्या भावनेचा विचार करायचा कंड असेल तर, विरोधात निवडणूक लढवू नका… म्हणे, निवडून आलो आणि पराभुताच्या भेटीला गेलो, त्याच्या आईच्या पाया पडलो आणि राजकीय पोळी भाजून घेतली… मनात आढी ठेवायची, प्रचारात यथेच्छ हेटाळणी करायची, आरोप करायचे, खासगीत नको ते बोलायचे… आणि वरती निवडून आल्यावर त्यांच्या दुःखी कुटुंबियांना आणखी त्रास द्यायला जाऊन खपल्या काढायच्या…😢 राजकारणात वाद वैचारिक असतात ना..? मग तुमचा विरोध वैयक्तिक का होतो..? बरे एकदा विरोधात लढायला निघाला की, कार्यकर्ते बेफामपणे विरोधकांना लक्ष्य करतात. निकाल लागला की पराभूत गटाचे कार्यकर्ते दुःखात असतात. उमेदवारही त्याच मनस्थितीत असतोय… इतक्यात निवडून आलेला तिथे जातो आणि आईच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याचे नाट्य करतो. फेटा बांधून घेऊन फोटो काढून त्याचे भांडवल करतो… पराभूत झालेल्यांना हा पुन्हा एकदा त्रास देण्याचा वाईट प्रकार भारतीय राजकारणात रूढ झालाय… हा प्रकार राजकारणातील किळसवाणा व अघोरी सूड उगवण्याचाच प्रकार आहे. विजयी उमेदवाराला इतका जर संबंधित परभाव झालेल्या उमेदवारांच्या भावनेचा, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भावनेचा पुळका वाटत होता तर, हा निवडणूक का लढवीत असेल बरे विरोधात..? अरे, घरात बस की.. आणि मग जा रोज त्यांच्या आईच्या पाया पडायला. पाया पडून फोटो काढून मिरवून मी किती बेस्ट पॉलिटीशीयन आहे हे भासविण्याची काहीही गरज नाही… त्यासाठी मतदारांनी तुम्हाला विजयी केलेले नाही. इतकाच लै पुळका अला असेल तर, मतदान न दिलेले हजारो-लाखो असतात त्या सगळ्यांच्या पाया पडायला जात जा की… ज्यांनी मतदान दिले त्या हजारो-लाखोंच्या पाया पडायलाही हरकत नाही. मतदारसंघात विकासकामे करून विचारीपणा व सामंजस्य दाखवायला पाच वर्षे आहेत. त्याच काळात समजा न ठरवून विरोधी उमेदवार किंवा त्यांच्या आई व कुटुंबातील कोणाची भेट झाली तर पडा की चारदा पाया… दुखावल्या गेलेल्यांना डागण्या देण्यासाठी घरी जाऊन, फोटो काढून कोणता वैचारिक राजकारणाचा नवा पायंडा पडणार आहे..? लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*