Blog | सरकार स्थापनेसाठी खेळ उरला या पाच शक्यतांचा..!

रणनीती कुणाची यशस्वी होणार?
सेना, भाजप की पवारांची?
पुढील १२ तासात मुत्सद्देगिरीचा कस लागून त्यातूनच “रणनीतीचा सिकंदर” कोण आहे ते ठरणार आहे. संभाव्य शक्यता : १) पवारांकडे गमावण्यासारखे काहीच नसल्याने निर्णय कसाही लागो, त्यांची प्रतिमा उजळून निघणार आहे. इतर सर्व पक्षातील नेत्यांची उंची घटत असताना पवारांनी खुबीने व कौशल्याने आपली उंची वाढवून घेतली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे राजकारणावर त्यांचा सर्वात जास्त दबदबा असेल. २) मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड केल्यास भाजपच्या एकंदरीतच कार्यशैलीबाबत संशयाचे वातावरण तयार होईल. मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड न केल्यास सहकारी पक्षांचा कर्दनकाळ व विश्वासघातकी पक्ष म्हणून भाजपची प्रतिमा आणखी गडद होत जाईल. इतर पक्षातील आमदार फोडून स्वबळावर सरकार स्थापण्याच्या दिशेने पाऊल टाकल्यास भाजपच्या “नैतिक मूल्याच्या” गोष्टी म्हणजे केवळ वल्गना असल्याचे पुन्हा एकवार अधोरेखित होईल. सत्ता मिळेल पण त्याबदल्यात भाजपाला बरेच काही गमवावे लागेल. ३) खरी कसोटी सेनेची लागणार आहे. “सेनेचा मुख्यमंत्री” हा मुद्दा त्यांनी नको तेवढा ताणून धरल्याने आता परतीचे मार्ग बंद झाले आहेत. पण तरीही त्यांनी आता माघार घेऊन मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडून सत्तेत सामील व्हायचे ठरवले तर शिवसेना म्हणजे पोकळ डरकाळ्या फोडणारा कागदी वाघ व सत्तेसाठी बार्गेनिंग करणारा पक्ष म्हणून शिवसेनेची प्रतिमा मालिन होईल.
रबर किती ताणावा, याचा अंदाज आला नाही तर एकतर रबर तरी तुटतो किंवा असह्य तडाखा तरी बसतो. ४) राष्ट्रवादी व सेना एकत्र येऊन सत्ता स्थापन केल्यास त्यांना काँग्रेसची गरज नाही. मध्यावधीच्या भयाने अपक्ष कुणीकडून कुणीकडेही जाऊ शकतात. भाजप व काँग्रेस फुटणे अजिबात अवघड नाही. ५) राष्ट्रपती राजवट आली तरी हि तात्पुरती व्यवस्था असेल. सरकार नंतरही स्थापन होऊ शकते. सत्तेचे संतुलन राखण्याइतकी ताकद अपक्षांची असल्याने कोणत्याही स्थितीत ते मध्यावधी लादू देणार नाहीत. लेखक : गंगाधर मुटे आर्वीकर
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*